नागपूर: शहर स्वच्छ करायचे असेल तर त्यासाठी नागरिकांची मानसिकता महत्त्वाची असते. प्रत्येकाने स्वच्छता हा वैयक्तिक आणि कुटुंबाचा विषय समजावा. माझे घर जसे स्वच्छ ठेवणे ही जबाबदारी आहे तसेच शहर स्वच्छ ठेवणे, ही सुद्धा जबाबदारी आहे, ही मानसिकता जर प्रत्येक नागरिकाची झाली तर शहर स्वच्छ होण्यास मुळीच वेळ लागणार नाही, असे मत नागपूरच्या वैद्यकीय क्षेत्रातील प्रख्यात डॉ. उदय बोधनकर यांनी मांडले.
नागपूर महानगरपालिकेतर्फे डॉ. उदय बोधनकर यांची ‘स्वच्छता ॲम्बेसेडर’ म्हणून निवड करण्यात आली. महापौर नंदा जिचकार यांनी गुरुवारी (ता. २१) मनपाच्या मुख्यालयात त्यांचा शाल, स्मृतिचिन्ह व तुळशीचे रोपटे देऊन सत्कार केला. डॉ. बोधनकर यांनी स्वत: महापालिकेच्या स्वच्छता अभियानात सहभागी होण्याचा मानस व्यक्त केला. ही स्वागतार्ह बाब आहे. त्यांच्यासारख्या प्रख्यात व्यक्तींकडून स्वयंप्रेरणेने स्वच्छतेबाबत जनजागृती होणे ही शहरासाठी अभिमानाची बाब आहे, असे म्हणत महापौर नंदा जिचकार यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले आणि महापालिकेचे स्वच्छतादूत बनल्याबद्दल अभिनंदन केले.
नागपूर महानगरपालिकेतर्फे देण्यात येत असलेला स्वच्छतेचा संदेश आपण शक्य तितक्या लोकांपर्यंत पोहोचवू, अशी ग्वाही डॉ. उदय बोधनकर यांनी दिली. त्यांनी त्याचवेळी स्वच्छता ॲप मोबाईलवर डाऊनलोड करून नागरिकांनीही जास्तीत जास्त संख्येने ॲप डाऊनलोड करून तक्रारी पाठविण्याचे आवाहन केले.
यावेळी अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, अतिरिक्त उपायुक्त राजेश मोहिते, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार उपस्थित होते. संचालन जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांनी केले.