नागपूर : अंधश्रद्धेच्या आड सामाजिक अधःपतनाला कारणीभूत ठरणारी एक संतापजनक घटना नागपूरमध्ये समोर आली आहे. ‘पैशांचा पाऊस’ पाडण्याच्या आमिषाने भोंदूबाबाने मध्यरात्री नग्नपूजेसारख्या विकृत विधीचे आयोजन करून तीन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून, एका महिलेचाही त्यात समावेश आहे.
ही घटना मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन दिवसांपूर्वी घडली. मुख्य आरोपी अब्दुल कादीर ऊर्फ कदीलबाबा याने ‘नग्नपूजा केल्यास रातोरात पैसे मिळतील’ असा दावा करत अंधश्रद्धेचा आधार घेतला. त्याला मदतीला आशिष नावाचा तरुण आणि त्याच्या लिव्ह-इन पार्टनर महिलेने साथ दिली. या दोघांनी आपल्या ओळखीतील आणखी दोन जणांच्या मदतीने गरीब घरातील तीन अल्पवयीन मुलींना फसवले.
सुरुवातीला ‘फक्त कपडे काढावे लागतील’ अशी बतावणी करत मुलींना भुरळ घालण्यात आली. आर्थिक अडचणींचा फायदा घेत त्यांना या ‘पूजेसाठी’ तयार करण्यात आले. रविवारी रात्री सर्व आरोपी कदीलबाबाच्या घरी जमा झाले. मध्यरात्री पूजेच्या नावाखाली मुलींना बहुधा गुंगीचे औषध देण्यात आले आणि त्यानंतर त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले.
सकाळी शुद्धीवर आल्यानंतर मुलींनी आपला अनुभव आपल्या एका परिचित तरुणाला सांगितला. त्याने तातडीने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवत कदीलबाबा, आशिष व अन्य तिघांना अटक केली. सर्व आरोपींना २५ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या प्रकारामागे पूर्वनियोजित कट असण्याची शक्यता वर्तवली जात असून, कदीलबाबा यापूर्वीदेखील अशा घटनांमध्ये गुंतलेला असावा, असा पोलिसांचा संशय आहे. पोलिसांनी या प्रकरणात अतिशय गोपनीयता बाळगली असून, आरोपींची नावे अद्याप अधिकृतपणे जाहीर केलेली नाहीत.
या गंभीर प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. या कृत्यात अत्याचाराचे व्हिडिओ रेकॉर्डिंग वगैरे करण्यात आले का, याचा शोधही पोलिस घेत आहेत. या घटनेने अंधश्रद्धेचा अंधकार केवढ्या थराला पोहोचू शकतो, याचे भयानक उदाहरण समाजासमोर उभे केले आहे. गरीब, असहाय मुलींना फसवून त्यांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या अशा विकृत मानसिकतेविरोधात समाजाने एकजुटीने उभे राहण्याची वेळ आली आहे.