सुरक्षा व्यवस्थेचा ताण वाढला
नागपूर : सुरक्षेच्या दृष्टीने अंत्यत महत्वाची असलेली बॅगेज स्कॅनर बुधवारी रात्रीपासून बंद आहे. पश्चिम प्रवेशव्दारावरील बंद मशिनमुळे मेटल डिटेक्टरमुळे सामानांची तपासणी केली जात आहे.
नागपुरात गुरुवारपासून सैन्य भरती सुरू झाली. २ जानेवारीपर्यंत ही भरती राहणार आहे. यासाठी देशभरातून उमेदवार आले आहेत. त्यामुळे स्टेशनवर प्रचंड गर्दी झाली आहे. आधीच प्रवाशांची गर्दी त्यात अतिरीक्त गर्दी वाढल्यामुळे सुरक्षा व्यवस्थेची तारांबळ उडाली आहे. नागपूर स्थानकावर पूर्व आणि पश्चिम प्रवेशव्दारावर प्रत्येकी एक बॅगेज स्कॅनर मशिन आहे. स्टेशनच्या आत जाताना प्रत्येक प्रवासी आपले सामान मशिनमध्ये तपासणी करुनच आत जातो.
मात्र बुधवारच्या रात्रीपासून पश्चिम प्रवेशव्दाराकडील मशिन अचानक बंद झाल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. नागपूर रेल्वे स्थानकावर दररोज १५० पेक्षा अधिक प्रवासी गाड्या धावतात. ३० ते ३५ हजार प्रवाशांची वर्दळ असते. त्यामुळे प्रत्येक प्रवाशाची बॅग तपासने शक्य होत नाही.
अशा स्थितीत तपासणी न करताच प्रवासी आत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापूर्वी अनेकदाही ही मशिन बंद झाली. या मशिनचे मेंटनंस एका कंपनीकडे आहे. त्या कंपनीचे कर्मचारी आल्यावरच मशिनची दुरूस्ती केली जाईल. तो पर्यंत मेटल डीटेक्टरने तपासणी केली जात आहे.