जलयुक्त शिवार योजनेला 21 हजार रुपयांचा धनादेश प्रदान
नागपूर : भारतीय संस्कृतीमध्ये दसरा सणाला महत्त्व असून, आपण दसरा विजयादशमी म्हणून साजरा करतो. ज्यावेळी अन्याय पराकोटीला जातो, त्यावेळी सज्जनशक्ती संघटीत होते. आणि न्यायाचा आणि सज्जनशक्तींचा दुर्जनशक्तीवर विजय होतो, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
जयताळा येथे झुंजार नागरिक मंचच्या वतीने आयोजित रावणदहन कार्यक्रमप्रसंगी मुख्यमंत्री उपस्थित नागरिकांना शुभेच्छा देताना बोलत होते. यावेळी व्यासपीठावर लघु उद्योग मंडळाचे अध्यक्ष संदीप जोशी, मंडळाचे अध्यक्ष तथा नगरसेवक किशोर वानखेडे, नगरसेवक दिलीप दिवे, संयोजक ॲड. नितीन तेलगोटे, नाना सातपुते, नितीन पाटील, सुरेंद्र वाघ आदी समितीचे सदस्य उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, जेव्हा आपल्या सभोवती समाजात अन्याय, अत्याचार दुराचार वाढतात. त्यावेळी दुर्जनशक्तींचे दहन केले जाते. रावण ही व्यक्ती नसून प्रवृत्ती आहे. आपण त्या अन्याय, अत्याचार दुराचार असलेल्या प्रवृत्तीचे प्रतीक म्हणून दहन करत असतो. गेल्या 15 वर्षांपासून झुंजार नागरिक मंच सामाजिक प्रदूषणाविरुध्द झुंज देत आहे, असे त्यांनी सांगितले.
सज्जनशक्ती हे प्रभू श्रीरामाचे स्वरुप आहे. ही संघटीत शक्तीच प्रभू श्रीरामाची संघटीत प्रवृत्ती आहे. ही संघटीत शक्तीच दुष्कृत्याचा नाश करते. त्या सज्जनशक्तीला नमन करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, प्रभू श्रीरामाच्या आशिर्वादामुळे नागरिकांनी सज्जनशक्तीच्या पथावरुन मार्गक्रमण करावे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित नागरिकांना यावेळी विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी झुंजार नागरिक मंचाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेला 21 हजार रुपयांचा धनादेश प्रदान केला. जयताळा परिसरात 21 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर दरम्यान सहा ठिकाणी निशुल्क आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या आरोग्य शिबिरादरम्यान शहरातील नामांकित रुग्णालयात मोफत संपूर्ण चाचणी, औषधी मिळणार आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन नगरसेवक किशोर वानखेडे यांनी यावेळी प्रास्ताविकात केले.
विजयादशमीनिमित्त दुष्टप्रवृत्तीचे दहन व्हावे – मुख्यमंत्री
विजयादशमी निमित्त दुष्टप्रवृत्तीचे दहन व्हावे अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केली. सनातन धर्म युवक सभेच्या वतीने कस्तुरचंद पार्कवर आयोजित रावण दहन कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सर्वश्री आमदार कृष्णा खोपडे, डॉ.मिलिंद माने, सुधाकर देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, वाईट प्रवृत्तीवर चांगल्या प्रवृत्तींचा विजय म्हणजे विजयादशमीचा सण. विजयादशमीच्या दिवशी आपण दुष्टप्रवृत्तीचे प्रातिनिधिक स्वरुपात दहन म्हणजे रावण दहन होय. कस्तुरचंद पार्कवर अनेक वर्षापासून सातत्याने रावण दहनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. या कार्यक्रमाच्या आयोजनाच्या सातत्याबद्दल त्यांनी आयोजकांचे कौतुक केले.