मुंबई: राज्यातील शेतक-यांसंदर्भात देवेंद्र फडणवीस सरकारने एक महत्वपूर्ण निर्णयाची घोषणा केली आहे. राज्यातील शेतक-यांचं सरसकट दीड लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ करण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. या कर्जमाफीचा फायदा राज्यातल्या 89 लाख शेतक-यांना फायदा होणार आहे.
राज्यातल्या शेतकऱ्यांना 34 हजार कोटींची कर्जमाफी देण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. ‘छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना’ असं या कर्जमाफीला नाव देण्यात आले आहे. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 25 टक्के रक्कम (25 हजार रुपये कमाल मर्यादा) अनुदान म्हणून दिलं जाणार आहे.
आजवरच्या काळात महाराष्ट्र सरकारने दिलेली ही सर्वात मोठी कर्जमाफी आहे. आम्ही याबाबत सर्वपक्षीय नेत्यांशी आणि सगळ्या शेतकरी नेत्यांशी चर्चा केली आहे आणि त्यानंतरच हा निर्णय घेतला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. भाजपचे मंत्री आणि आमदार एक महिन्याचा पगार कर्जमाफीसाठी देणार असल्याचंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
आजी-माजी मंत्री, क्लास वन अधिकारी, करदाते, व्यापारी, व्हॅट पात्र यांना कर्जमाफीतून वगळण्यात आले आहे. कर्जमाफीचं काटेकोर निरीक्षण केले जाईल. शिवाय, बँकांवरही लक्ष ठेवणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.