नागपूर : सौर ऊर्जेद्वारे शेतकऱ्यांना दिवसाही मुबलक वीज उपलब्ध करून देणाऱ्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना व कृषीपंपांना नवीन वीजजोडणीसह दर्जेदार वीजपुरवठा देणाऱ्या उच्चदाब वितरण प्रणाली (एचव्हीडीएस) या महावितरणच्या नव्या योजनांमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान निश्चित उंचावेल अशी ग्वाही मुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील परिषद सभागृहात आज (दि. १६) आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना, उच्चदाब वितरण प्रणाली (एचव्हीडीएस) योजना व विद्युत वाहनांकरीता उभारण्यात आलेल्या महावितरणच्या चार्जिंग स्टेशन्स या तीन नव्या योजनांचे मुख्यमंत्री ना. श्री. फडणवीस यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी महसूल मंत्री ना. श्री चंद्रकांतदादा पाटील, गृहनिर्माण मंत्री ना. श्री. प्रकाश मेहता, आदिवासी विकास मंत्री ना. श्री. विष्णू सावरा, सहकारमंत्री ना. श्री. सुभाष देशमुख, अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. श्री. गिरीश बापट, जलसंपदा मंत्री ना. श्री. गिरीश महाजन, ऊर्जा व राज्य उत्पादन शुल्क मंत्री ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळे, पर्यटनमंत्री ना. श्री. जयकुमार रावल, गृह राज्यमंत्री ना. श्री. दीपक केसरकर, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, उद्योग राज्यमंत्री ना. श्री. प्रवीण पोटे, राज्याचे मुख्य सचिव श्री. डी.के. जैन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
याप्रसंगी मुख्यमंत्री ना. श्री. फडणवीस म्हणाले, की मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजनेद्वारे राज्यातील सुमारे ७ लाख ५० हजार शेतकऱ्यांना दिवसाही पुरेशी वीज मिळणार आहे. यासोबतच शेतकऱ्यांना स्वस्त दराने वीज उपलब्ध होणार असून उद्योगांवरील सबसीडीचा भार सुद्धा कमी होईल. मागील ४ वर्षांत महावितरणने ग्राहकाभिमुख सेवा देण्यासाठी केलेल्या विविध प्रभावी उपाययोजनांचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.
यावेळी ऊर्जामंत्री ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी सौरकृषी वाहिनी योजना सुरु करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असून महावितरणच्या या तिनही योजना राज्याचा कायापालट करणाऱ्या ठरणार आहेत, असे सांगितले. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाला राज्यातील आमदार, ऊर्जा सचिव अरविंद सिंह व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते