नागपूर : छत्तीसगड येथील कोळसा खाणीमध्ये भ्रष्टाचार केल्याप्रकरणी कॉंग्रेसचे माजी राज्यसभा सदस्य विजय दर्डा , त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा आणि एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक मनोज कुमार जयस्वाल यांनाही सीबीआयच्या दिल्ली विशेष न्यायालयाने चार वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
याच प्रकरणात न्यायालयाने माजी कोळसा सचिव एचसी गुप्ता, दोन ज्येष्ठ लोकसेवक केएस क्रोफा आणि केसी सामरिया यांना तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने विजय दर्डा आणि इतरांना कलम 120 बी, 420 आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या इतर कलमांखाली दोषी ठरवले आहे.
जेएलडी यवतमाळ एनर्जी लिमिटेडला छत्तीसगडमधील पूर्व फतेहपूर कोळसा खाणी मिळाल्या होत्या. हा एका षडयंत्राचा भाग होता. यात पात्रतेच्या निकषांचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. तसेच अर्जांमध्ये चुकीचे दावे करण्यात आले. सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत आरोप सिद्ध झालेले हे १३ वे प्रकरण आहे. राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा, त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा, कोळसा विभागाचे माजी सचिव एच. सी. गुप्ता, के. एस. क्रोफा आणि के. सी. सामरिया, जेएलडी यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड आणि त्यांचे संचालक मनोज कुमार जयस्वाल इत्यादींचा समावेश आहे. या प्रकरणात एच. सी. गुप्ता आणि इतर दोन अधिकारी के. एस. क्रोफा आणि के. सी. सामरिया या तिघांना प्रत्येकी तीन वर्षे शिक्षा सुनावण्यात आली आहे. जेएलडी यवतमाळला कोर्टाने ५० लाखांचा दंडही ठोठावला आहे.