सहा. निवडणूक निर्णय अधिकारी जोगेंद्र कटयारे ने पत्र परिषदेत दिली माहिती
रामटेक: १0 मार्च रोजी सायंकाळी ५ वाजतापासून आचारसंहिता लागू झाली असून, यासंदर्भात भारतीय निवडणूक आयोग दिल्ली यांनी संपूर्ण भारतात एकूण ७ टप्पात मतदान प्रक्रिया पार पाडत असल्याचे कळविले आहे.त्यामुळे मतदारांनी लोकशाहीतील मतदान प्रक्रियेस सहकार्य करून आचारसंहितेचे सर्वांनी काटेकोर पालन करावे, असे आवाहन सहा. निवडणूक निर्णय अधिकारी जोगेंद्र कटयारे यांनी केले.
भारतीय निवडणूक आयोग दिल्ली यांनी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार दि.११ एप्रिल रोजी नागपूर व रामटेक या दोन्ही लोकसभा मतदार संघाकरिता मतदान होणार आहेत. रामटेक विधानसभा क्षेत्रातील निवडणूक पूर्व तयारी पूर्ण झालेली असून, आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी लागू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.तर यादरम्यान 0९ रामटेक लोकसभा मतदार संघाकरिता श्रीधर फडके अप्पर जिल्हाधिकारी नागपूर हे निवडणूक निर्णय अधिकारी असून, 0५९ रामटेक विधानसभा संघ क्षेत्राकरिता सहा. निवडणूक निर्णय अधिकारी जोगेंद्र कटयारे उपविभागीय अधिकारी रामटेक हे आहेत. 0५९ रामटेक विधानसभा क्षेत्राअंतर्गत एकूण ३0६ गावांचा अंतर्भाव होत असून, यात १५७ गावे रामटेक तालुक्यात, १२0 गावे पारशिवनी तालुक्यात तर २९ गावे मौदा तालुक्यात अंतभरूत आहेत.
यातील १५७ रामटेक तालुक्यात, १५४ पारशिवनी तालुक्यात तर ४६ मौदा तालुक्यात मतदान केंद्र आहेत. सर्व मतदान केंद्राची प्राथमिक तपासणी हि देखील पूर्ण करण्यात आली आहे. 0५९ रामटेक विधानसभा क्षेत्रासाठी ३६ झोनल ऑफीर्सची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
या व्यतिरिक्त शासकीय, निमशासकीय संस्थेतील कर्मचारी यांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयास हस्तांतरीत करण्यात आलेली आहे. एकूण ३५७ मतदान केंद्राकरिता राखीवसह १५७२ कर्मचार्यांची आवश्यकता राहणार असून, उपलब्ध कर्मचारी हे याहून अधिक असल्याने कोणतीही अडचण येणार नाही.
आचार संहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्याकरिता एकूण ३ स्थायी सर्वेक्षण चमू (एसएसटी), ३ व्हिडिओ सर्वेक्षण चमू (वीएसटी), २ व्हिडिओ चमू (वीवीटी), ४ भरारी पथक (एफएसटी) तयार करण्यात आल्या आहे. या व्यतिरिक्त सीव्हीआयजीआयएल ‘अँप’ द्वारे मिळणार्या माहितीवर नियंत्रण कक्षाद्वारे बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे लोकशाहीतील मतदान प्रक्रियेस सहकार्य करावे, असे आवाहन सहा. निवडणूक निर्णय अधिकारी जोगेंद्र कटयारे यांनी केले आहे.