देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ७५ फूट उंच गुढीचे पूजन : सामुहिक हनुमान चालीसा व रामरक्षा पठणचे देखील आयोजन
नागपूर : हिंदू नववर्षारंभ अर्थात गुढीपाडवा आणि या पावनदिनापासून सुरूवात होत असलेल्या प्रभू श्रीरामाच्या नवरात्रींच्या अनुषंगाने शनिवारी (२ एप्रिल) आठ रस्ता चौक लक्ष्मीनगर येथे सकाळी ६.३० वाजता सामुहिक आरती आणि नववर्ष स्वागत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ७५ फूट उंच गुढी उभारण्यात येणार आहे. यावेळी माजी महापौर श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्टचे अध्यक्ष संदीप जोशी उपस्थित राहतील.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य लक्षात घेउन आठ रस्ता चौक लक्ष्मीनगर येथे ७५ फूट गुढी उभारून मराठमोळ्या पद्धतीने नववर्षाचे स्वागत करण्यात येणार आहे. यावेळी ढोलताशा, लेझिम पथक, भजन मंडळी यांच्या सहभागाने लक्ष्मीनगर चौकातून प्रभू श्रीरामाची पालखी निघणार आहे. यानंतर सामुहिक हनुमान चालीसा पठण, रामरक्षा पठन आणि सामुहिक आरती केली जाईल.
प्रभू श्रीरामाच्या पालखीचे स्वागत करण्यासाठी आणि सामुहिक हनुमान चालीसा व रामरक्षा पठण यामध्ये सहभागी होण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येत उपस्थित रहावे, असे आवाहन नववर्ष अभिनंदन समारोह समिती, श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट, दि सायंटिफीक को-ऑप. हाउसिंग सोसायटी लक्ष्मीनगर, पी.एम.जी. ऑफीस स्टाफ को. ऑप. हाउसिंग सोसायटी माधवनगर, दि सेंट्रल रेल्वे एम्प्लॉईज को-ऑप. हाउसिंग सोसायटी सुरेंद्रनगर, तात्या टोपे नगर नागरिक मंडळ, श्री. राजेश्वरी मंदिर अत्रे लेआउट प्रतापनगर, श्री. गणेश मंदिर टोपेनगर, श्रीराम मंदिर विवेकानंदनगर, ज्ञानेश्वर मंदिर बजाजनगर आदी संस्थांनी केले आहे.