नागपूर: मनपा शाळांतून अधिक दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शिक्षण समितीसह सर्व अधिकारी, शाळा निरीक्षक आणि शिक्षक परिश्रम घेत आहेत. डिजिटायझेशनसाठी सुमारे १५१ शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले. आता या शाळांतील पटसंख्या वाढणे अत्यावश्यक आहे. त्यासाठीही समिती सभापती, सदस्य, नगरसेवकांसह अधिकारी आणि शिक्षकांनी सामूहिक प्रयत्न गरजेचे असल्याचे प्रतिपादन शिक्षण समितीचे सभापती प्रा. दिलीप दिवे यांनी केले.
नागपूर महानगरपालिकेच्या शिक्षण समितीची बैठक गुरुवारी (ता. ३) मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृति सभागृहात पार पडली. सदर बैठकीत ते बोलत होते. बैठकीला समितीच्या उपसभापती भारती बुंडे, सदस्या रिता मुळे, प्रमिला मथरानी, सदस्य राजेंद्र सोनकुसरे, इब्राहिम तौफिक अहमद, नितीन साठवणे, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार उपस्थित होत्या.
नवीन शैक्षणिक वर्षांत मनपा शाळांतील पटसंख्या वाढविण्यासाठी शाळा स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. त्याचा झोननिहाय आढावा शाळा निरीक्षकांकडून घेण्यात आला. पटसंख्या वाढविण्यासाठी काही शाळांनी परिसरातील वस्त्यांमध्ये काही विशेष उपक्रम राबविले का, कुठल्या शिक्षकांनी स्वत: नगरसेवकांची मदत घेतली का, याबाबतही शाळा निरीक्षकांकडून माहिती घेण्यात आली.
नागपूर शहरातील सर्व नगरसेवकांना शिक्षकांनी भेटावे. पटसंख्या वाढीसाठी त्यांची मदत घ्यावी. संस्कार वर्ग, उन्हाळी शिबिर किंवा अन्य उपक्रम परिसरात राबवून शाळाबाह्य विद्यार्थ्यांची नोंदणी करावी, असे निर्देश सभापती प्रा. दिलीप दिवे यांनी शाळा निरीक्षकांना दिले.
यावेळी शालेय गणवेश आणि पाठ्यपुस्तकांबाबतचा आढावाही सभापतींनी घेतला. प्राथमिक शिक्षकांची सेवाज्येष्ठता यादी तातडीने प्रकाशित करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. मनपाअंतर्गत असणाऱ्या शाळा डिजीटल करण्याच्या दृष्टीने मागील शैक्षणिक वर्षात मनपातील सुमारे १५१ शिक्षकांना डिजीटल प्रशिक्षण देण्यात आले. या शिक्षकांनी त्यानंतर त्याचा उपयोग कसा केला, याचीही माहिती सभापती प्रा. दिवे यांनी घेतली. प्रशिक्षण घेतलेल्या शिक्षकांनी त्यांच्या शाळांतील अन्य शिक्षकांना प्रशिक्षित करावे, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
बैठकीला सहायक शिक्षणाधिकारी, क्रीडा निरीक्षक व अन्य अधिकारी उपस्थित होते.