नागपूर/मुंबई : पूर्व विदर्भातील अवकाळी पावसामुळे पूर परिस्थितीचा सामना करावा लागलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत या संदर्भात प्रश्न विचारला. ज्याला आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सकारात्मक उत्तर देत आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या खात्यात वळती करणार असल्याचे सांगितले.
पूर्व विदर्भात अवकाळी पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती. यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले. पीक पूर्णतः वाहून गेल्याने आणि घरांमध्ये पुराचे पाणी गेल्याने असंख्य संसार रस्त्यावर आलेत. शासकीय अहवालानुसार सुमारे ३ हजार ३९९ हेक्टर शेत जमिनीला या संकटाचा फटका बसला आहे. परंतु अजूनही या शेतकऱ्यांपर्यंत आर्थिक मदत राज्य सरकारकडून पोहोलेली नाही. यासंदर्भात आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत विनंती केली, ज्या विनंतीस मान देऊन आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी २९ कोटी ९० लाख रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात वळता करणार असल्याचे जाहीर केले.
मुळात या संकटाची दाहकता पाहता राज्य सरकारने १३२० कोटींची मदत जाहीर केली होती. परंतु आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्र्यांनी निधीच्या निकषांचा दाखला देत केवळ २९ कोटी ९० लाख रुपयांचाच निधी का जाहीर केला याचा आ. चंद्रशेखर बावनकुळेंनी पाठपुरावा केला. मदतीचा हा अहवाल विभागीय आयुक्तांनी आपत्ती व्यवस्थापन निकषांच्या आधारेच तयार केला असल्याचे यावेळी आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी श्री विजय वडेट्टीवार यांच्या लक्षात आणून दिले. अखेर श्री विजय वडेट्टीवार यांनी उर्वरित सगळा निधी महिन्याभरात शेतकऱ्यांना देऊ असे जाहीर केले.
पूर्व विदर्भातील कृषीक्षेत्र आदिवासी बहुल, मागास, अतिदुर्गम, जंगल व्याप्त व नक्षलग्रस्त आहे. या क्षेत्रातील शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून आहे. परंतु अचानक आलेल्या पुरामुळे येथील शेतकरी उद्ध्वस्त झाला. त्याचे उभे पीक पूर्णतः नष्ट झाले, घरं पडल्याने अनेकजण बेघर झाले. परंतु मदत जाहीर करूनही शासनाकडून ती मिळाली नसल्याची खंत आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली.