नागपूर: नाग नदी स्वच्छता हे प्रत्येक नागपूरकरांचे स्वप्न आहे. गेल्या काही वर्षांपासून महापालिका प्रशासनाच्या पुढाकारातून नाग नदी, पिवळी नदी, पोहरा नदी स्वच्छतेचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. हे अभियानाने आता लोकचळवळीचे स्वरूप घेतले असून नागपुरातील प्रत्येक नागरिकाने या चळवळीत सहभाग नोंदवावा, असे आवाहन नागपूर महानगरपालिका स्थायी समितीचे सभापती विरेंद्र कुकरेजा यांनी केले.
७ मे पासून सुरू होणाऱ्या नदी स्वच्छता अभियानाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. बैठकीला आमदार प्रा. अनिल सोले, सत्ता पक्ष नेते संदीप जोशी, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, मनपाचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रकाश पाटील, मनपाचे प्रभारी मुख्य अभियंता मनोज तालेवार उपस्थित होते.
यावेळी बोलताना स्थायी समिती सभापती विरेंद्र कुकरेजा यांनी लोकसहभागासाठी आवाहन केले. ते म्हणाले, आपल्या शहरासाठी काहीतरी देणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. नाग नदी स्वच्छता आणि नाग नदी सौंदर्यीकरण हे आपले स्वप्न आहे. कुठलाही प्रकल्प हा लोकसहभागाशिवाय पूर्ण होणे शक्य नाही. त्यामुळे प्रत्येक शासकीय कार्यालय, उद्योग, कंपनी, कार्पोरेट कार्यालय, शिक्षण संस्था आणि व्यक्तीश: नागरिक यांनी या मोहिमेत योगदान दिले तर नागनदीचे उद्याचे चित्र वेगळे असेल.
आमदार प्रा. अनिल सोले म्हणाले, सन २०१३ पासून नाग नदी स्वच्छता अभियान सुरू करण्यात आले. नदीतील कचरा स्वच्छ करणे, गाळ काढणे यासोबतच लगतच्या परिसराचे सौंदर्यीकरण करणे, हा या अभियानाचा उद्देश आहे. आतापर्यंत नागपुरातील अनेकांनी या अभियानात योगदान दिले आहे. यावर्षीही ही मोहीम लोकसहभागातूनच प्रभावीपणे राबवून नवा आदर्श निर्माण करेल, असे ते म्हणाले.
जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी प्रशासकीय यंत्रणेला या मोहिमेसाठी सज्ज राहण्याचे निर्देश दिले. शहरातील उद्योगांनी, विविध असोशिएशनने आपआपल्या परीने योगदान देण्याचे आवाहन त्यांनी केले.
नदी स्वच्छता अभियानात सहभाग नोंदविणाऱ्या संस्थांना प्रमाणपत्र देऊन प्रशासनातर्फे सन्मानित करण्यात यावे, अशी सूचना विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे यांनी मांडली.
या बैठकीत नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडिया, नागपूर सुधार प्रन्यास, नागपूर मेट्रो रेल कार्पोरेशन, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यासह जिंजर मॉल ग्रुप, मनपा हॉटमिक्स प्लान्ट कॉन्ट्रॅक्टर्स असोशिएशन यंत्रसामुग्रीच्या माध्यमातून अभियानात सहभागी होणार असल्याचे त्यांच्या प्रतिनिधींनी सांगितले. होटल असोशिएशन, एसीसी बिल्डकॉन, एमआयडीसी नागपूर हे अभियानात आर्थिक सहभाग नोंदविणार आहेत तर एनटीपीसी, वेकोलि, सूर्यलक्ष्मी कॉटन इंडस्ट्रीज, क्रेडाई सीएसआर फंडाच्या माध्यमातून अभियानाला सहकार्य करणार असल्याचे त्यांच्या प्रतिनिधींनी सांगितले.
प्रास्ताविक प्रभारी मुख्य अभियंता मनोज तालेवार यांनी केले. कार्यक्रमाला विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी, विविध उपक्रम, उद्योगांचे अधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.