नागपूर : नागपूर महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी बुधवारी (ता. १४) पदभार स्वीकारला. यावेळी अपर आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी पुष्पगुच्छ देउन नवनियुक्त आयुक्त अभिजीत बांगर यांचे स्वागत केले.
याप्रसंगी उपायुक्त नितीन कापडनीस, अधिक्षक अभियंता मनोज तालेवार, सहायक आयुक्त (सामान्य प्रशासन विभाग) महेश धामेचा, सहायक आयुक्त प्रकाश वराडे, महा मेट्रोचे अतिरिक्त महाव्यवस्थापक संदीप बापट, विधी अधिकारी व्यंकटेश कपले, आरोग्य अधिकारी डॉ. सुनील कांबळे, सहायक संचालक नगररचना प्रमोद गावंडे, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, उपअभियंता दिपक चिटणीस, सहायक जनसंपर्क अधिकारी प्रदीप खर्डेनविस, आयुक्तांचे निजी सहाय्यक अनिल पाटील आदी उपस्थित होते.
नागपूर महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त अभिजीत बांगर हे एप्रिल २०१७ पासून अमरावती येथे जिल्हाधिकारीपदी कार्यरत होते. ते मूळ उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथील असून अनेक वर्षे त्यांचे वास्तव्य बार्शी येथे होते. त्यांनी पुणे येथे अर्थशास्त्र या विषयात एम. ए. केले आहे.
काही काळ गोखले इन्स्टिट्यूटमध्ये प्राध्यापक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. बांगर २००८ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी नागपूर येथे सहायक जिल्हाधिकारी, रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी म्हणून काम केले. पालघर या नवनिर्मित जिल्ह्याचे पहिले जिल्हाधिकारी म्हणून ऑगस्ट २०१४ रोजी त्यांनी पदभार स्वीकारला होता. बुधवारी सायंकाळी ७ वाजता आयुक्त अभिजीत बांगर यांनी नागपूर महानगरपालिकेची जबाबदारी स्वीकारली.