नागपूर : नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी बुधवारी (ता. ५) राजनगर परिसराला भेट दिली व नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी परिसरातील उद्यानाची पाहणी केली.
याप्रसंगी सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाच्या अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, उपायुक्त (उद्यान विभाग) श्री. गणेश राठोड, मंगळवारी झोनचे उपायुक्त श्री.अशोक गराटे, उद्यान अधीक्षक श्री. अमोल चौरपगार, कार्यकारी अभियंता श्री. सुनील उईके, कार्यकारी अभियंता (स्थावर) श्री. पंकज पराशर, उपस्थित होते.
श्री जितू गोपलानी यांनी राजनगर परिसरातील शिर्के लेआऊट आणि सुराणा लेआऊट भागात सिवर लाईन नसल्यामुळे पावसाळ्यात नागरिकांना मोठ्या समस्यांना समोर जावे लागते ही बाब आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली होती. आयुक्तांनी राजनगर येथील शिर्के लेआऊट आणि सुराना लेआऊट येथे भेट देत या भागातील सिवर लाईनची समस्या जाणून घेतली आणि ग्रीन पार्क, सुंदर वन उद्यानाची पाहणी केली. यावेळी आयुक्तांनी येथील नागरिकांशी चर्चा केली. नागरिकांनी आयुक्तांपुढे आपल्या समस्या मांडल्या.
आयुक्तांनी जायका प्रकल्प अंतर्गत डीपीआर मंजूर करुन लवकरच या भागात सिवर लाईन टाकण्यात येणार असल्याची ग्वाही नागरिकांना दिली. तसेच ग्रीन पार्क, सुंदर वन व इतर लहान उद्यानाकरीता संघटनांनी पुढाकार घ्यावा, महानगरपालिका अशा संघटनाशी करार करुन त्यांना ही उद्याने देखभाल दुरुस्तीसाठी देईल, असे आवाहनही आयुक्तांनी केले. उद्यानांमध्ये प्रकाश व्यवस्था करणे, कुलुप बंद असलेल्या उद्यानाची मालकी तपासणी करणे, उद्यानांमध्ये नियमित स्वच्छता राखणे, या संदर्भात देखील मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी निर्देश दिले.
यावेळी राजनगर येथील श्री. जितू गोपलानी, श्री. विजय नायडू, श्री. रुपचंद गोपलानी, श्री. नीरज गुप्ता, श्री. सुनील फुलझेले, श्री. जितेंद्र पालसिंग, श्री. रुमी धवन यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.