नागपूर: प्रत्येक झोन कार्यालयातील नागरिक सुविधा केंद्र अत्याधुनिक करुन जनतेला चांगल्या सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने विशेष देणे आवश्यक आहे. प्रशासनाची गतीमानता वाढावी यादृष्टीने आवश्यक ती पावले उचला. झोन कार्यालय परिसरातील भंगार त्वरित उचलून कार्यालय परिसर स्वच्छ व नीटनेटका करा. यात कुठेही अनियमितता आढळून आल्यास संबंधितावर कारवाई करण्यात येईल, असे निर्देश म.न.पा. आयुक्त विरेंद्र सिंह यांनी दिले.
शुक्रवारी (ता. १) सकाळी निगम आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी अपर आयुक्त रवींद्र कुंभारे यांचेसह प्रथम हनुमान नगर झोन क्र. ३ त्यानंतर नेहरुनगर झोन क्र. ५, गांधीबाग झोन क्र. ६ या तिन्ही झोनचे आयुक्तांनी आकस्मिक निरिक्षण केले. झोन कार्यालयातील विविध विभागाचा आढावा घेऊन कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.
प्रारंभी निगम आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी हनुमान नगर झोन कार्यालयाला भेट दिली. यावेळी आयुक्तांनी झोन अंतर्गत असलेल्या विविध विभागाला भेट देऊन कर्मचा-यांशी संवाद साधला. तेथील कार्यप्रणाली जाणून घेतली . या झोन कार्यालय परिसरात मोठया प्रमाणात जुने विदयुत खांब व भंगार आढळले. वापरण्याजोगे साहित्य ठेवून अन्य साहित्याची विल्हेवाट लावा, असे निर्देश त्यांनी दिले. झोन कर्यालयातील नागरी सुविधा केंद्र अत्याधुनिक करुन झोन मध्ये येणाऱ्या कोणत्याही नागरिकांना असुविधा होणार नाही यादृष्टीने विशेष लक्ष द्या. नागरी सुविधा केंद्र सुजज्ज, संगणीकृत करून अत्याधुनिक सुविधा पुरविण्याबाबत त्वरित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश सहायक आयुक्तांना राजू भिवगडे यांना दिले.
यानंतर आयुक्त यांनी नेहरु नगर झोनचा दौरा केला करून नागरी सुविधा केंद्राचे निरिक्षण केले. नागरी सुविधा केंद्र अत्याधुनिक करण्याच्या दृष्टीने नव्याने डिजाईन तयार करा, नागरी सुविधा केंद्रांतर्गत नागरिकांना कोणत्या सुविधा पुरविणार यासंदर्भात नियोजन करून तसे नमूद असलेला प्रस्ताव सात दिवसात सादर करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले.
झोन कार्यालयासमोरील भंगाराची त्वरित विल्हेवाट लावून परिसरात वृक्षारोपण करा. परिसराचे सौदर्यीकरण करा, असे सहायक आयुक्त राजेश कराडे यांना निर्देश दिले.
आयुक्तांनी त्यानंतर गांधीबाग झोनचे निरीक्षण केले. केळीबाग रस्त्याच्या रुंदीकरणामुळे बाधित इमारतीतील कार्यालय जुन्या कर विभागाच्या इमारतीत स्थानांतरित करण्यात आले आहे. त्याचीही पाहणी आयुक्तांनी केली. आयुक्तांनी संपूर्ण झोन परिसरातील विविध विभागाचे निरिक्षण केले. गांधीबाग झोनमधीलही भंगार त्वरित हटविण्याचे आदेश सहायक आयुक्त अशोक पाटील यांना दिले. गांधीबाग झोन समोरील जुन्या नगरभवन इमारतीमध्ये अत्याधुनिक व सर्व सोयींनी युक्त असे नव्याने नागरी सुविधा केंद्र तयार करण्याबाबत डिजाईन तयार करुन त्वरित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.
झोनमधील सर्व कर्मचारी कार्यालयीन वेळेत हजर होतात अथवा नाही, बायोमेट्रिक मशीनद्वारे हजेरी लावतात की नाही याकडे स्वत: सहायक आयुक्तांनी विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश तीनही झोनच्या सहायक आयुक्तांना दिले.
यावेळी अपर आयुक्त रवींद्र कुंभारे यांच्यासह सहायक आयुक्त राजू भिवगडे, सहायक आयुक्त राजेश कराडे, सहायक आयुक्त अशोक पाटील, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर उपस्थित होते.