नागपूर: नागपूर महानगरपालिकेतर्फे सक्करदरा येथील दत्तात्रय नगर उद्यान नावाने प्रसिद्ध असलेल्या श्री संत ज्ञानेश्वर संजीवन समाधी उद्यानाची मनपा आयुक्त आणि प्रशासक डॉ अभिजीत चौधरी व आमदार श्री. मोहन मते यांनी संयुक्तरित्या गुरुवारी (ता. 2) पाहणी केली. मनपाच्या उद्यान विभागातर्फे येथे सुगंधित फुलांचे उद्यान तयार केले जात आहे.
मागील दीड वर्षांपासून येथे काम सुरु असून नागरिकांसाठी उद्यान बंद करण्यात आलेले आहे. संथ गतीने सुरु असलेल्या कामाबद्दल आयुक्त डॉ. चौधरी आणि आमदार श्री मोहन मते यांनी नाराजी व्यक्त केली. डॉ. चौधरी यांनी उद्यानात सुरु असलेल्या कामाचे (Third Party Audit) ऑडिट करण्याचे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले. तसेच नागरिकांसाठी उद्यान सुरु करण्याचे देखील निर्देश उद्यान विभागाला दिले.
श्री संत ज्ञानेश्वर संजीवन समाधी उद्यानामध्ये संथ गतीने सुरू असलेल्या कामाबद्दल आमदार श्री. मोहन मते यांनी आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानुसार आयुक्तांनी उद्यानातील कामाचे निरीक्षण केले.
नागपूर सुधार प्रन्यासतर्फे तयार करण्यात आलेले सदर उद्यान नागपूर महानगरपालिकेला हस्तांतरित करण्यात आले होते. सात एकरच्या या उद्यानामध्ये पाच एकर परिसरात मनपा तर्फे मोगरा, मधू मालती, सोनचाफा, जाई जुई, चमेली, रांझाई, रातराणी, पारिजात, देशी गुलाब या सारख्या सुगंधित फुलांचे उद्यान दोन कोटी रुपये निधी खर्च करून तयार केले जात आहे.
उद्यानाचे काम सुरु असल्यामुळे नागरिकांना येथे प्रवेश बंदी आहे. आयुक्तांनी उद्यानात सुरु असलेल्या कामाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आणि अधीक्षक अभियंता श्री. मनोज तालेवार यांना सुरु असलेल्या कामाची विशेषज्ञांकडून तपासणी (Third Party Audit) करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच उद्यानात किरकोळ दुरुस्तीचे काम करण्याचेही आदेश दिले.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल, उपायुक्त श्री. गणेश राठोड, उद्यान अधीक्षक श्री. अमोल चौरपागार, नेहरू नगर झोनचे सहायक आयुक्त श्री. विकास रायबोले, कार्यकारी अभियंता श्री. नरेश शिंगनजोडे, श्री कमलेश चव्हाण आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.