Published On : Wed, Mar 15th, 2023
By Nagpur Today Nagpur News

आयुक्तांची ‘बॅटिंग’ ; आरबीआयवर मनपाचा विजय

गझदर लीग आंतरसंस्था क्रिकेट स्पर्धा
Advertisement

नागपूर : विदर्भ क्रिकेट असोसिएनच्या गझदर लीग टी-२० आंतरसंस्था क्रिकेट स्पर्धेत नागपूर महानगरपालिका संघाचे मनोधैर्य वाढविण्यासाठी मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांनी मैदानात उतरून संघासाठी फलंदाजी केली. मनपा संघाला मिळालेल्या प्रोत्साहनाने संपूर्ण संघाने दमदार कामगिरीचे प्रदर्शन करीत प्रतिस्पर्धी रिझर्व्ह बँक संघाचा ९ धावांनी पराभव करीत विजय नोंदविला.

सिव्हिल लाईन्स येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर झालेला सामना मनपा संघासाठी ऐतिहासिक ठरला. नागपूर महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच मनपा संघाकडून आयुक्तांनी सहभाग घेतला.

Gold Rate
Wednesday 15 Jan. 2025
Gold 24 KT 78,400 /-
Gold 22 KT 72,900/-
Silver / Kg 89,700 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सकाळच्या झालेल्या सामन्यात रिझर्व्ह बँक संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. नागपूर महानगरपालिका संघाने २० षटकांमध्ये ९ गडी बाद १३५ धावा काढल्या. संघाकडून प्रनूज नायरने ६८ धावांची उत्कृष्ट अर्धशतकी खेळी केली. संघाचा धावफलक वाढविण्याकडे कल असताना प्रतिस्पर्धी रिझर्व्ह बँक संघाचा कर्णधार परिमल हेडाउच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात प्रनूज झेलबाद झाला. यापाठोपाठ मनपा संघाचा कर्णधार नितीन झाडे (५०) याने अर्धशतक झळकावून निवृत्ती (रिटायर्ड आउट) स्वीकारली. यानंतर मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. फलंदाजीसाठी आले.

प्रतिस्पर्धी संघाच्या भेदक गोलंदाजीचा सामना करताना ते धावबाद झाले. मनपा संघाकडून अमोल चंदनखेडेने २१, संदीप सेलोकरने १२, विरेंद्र नाहारकरने ७, राहुल महाजनने ६, प्रशांत रामटेकेने ४, पुरूषोत्तम जानवारे आणि अनिल तांबे यांनी प्रत्येकी एक धाव काढली. प्रतिस्पर्धी आरबीआय संघाकडून रोहित कुमार आणि कर्णधार परिमल हेडाउने प्रत्येकी २ तर मनीष दोसी आणि नीरज गावंडेने प्रत्येकी १ गडी बाद केला.

उत्कृष्ट गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाच्या बळावर १३५ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आलेल्या रिझर्व्ह बँक संघाला ४ गडी बाद करून १२६ धावांवर रोखण्यात मनपा संघाला यश आले. मनपा संघाचे अमीर मोटघरे, अमोल चंदनखेडे, कर्णधार नितीन झाडे, पुरूषोत्तम जनवारे यांनी उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन करीत प्रत्येकी एक गडी बाद केला. अमीर मोटघरेने ४ षटकांमध्ये केवळ १६ धावा देत आरबीआय संघाला धावा घेण्यापासून रोखण्यात मोठी भूमिका बजावली. प्रतिस्पर्धी आरबीआय संघाच्या नीरज गावंडेने संघासाठी ६१ धावांची अर्धशतकी खेळी केली. तर संघाचा अमिताभ श्रीवास्तव (४७), कर्णधार परिमल हेडाउ (४४), मनीष दोसी (२५) यांनी संघासाठी उत्तम फलंदाजी केली.

विजेत्या मनपा संघाचे मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांनी अभिनंदन करीत खेळाडूंच्या खेळीचे कौतुक केले.

Advertisement