नागपूर : आसीनगर झोनअंतर्गत येणाऱ्या नारी तक्षशिला निर्वाण घाटाजवळ वाचनालयाचे बांधकाम सुरू आहे. त्यास मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी भेट दिली आणि तेथील समस्या जाणून घेतल्या. यानंतर त्यांनी परिसरात वृक्षारोपण केले.
यावेळी नासुप्रचे सभापती सूर्यवंशी, मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रीकोटकर, कार्यकारी अभियंता गिरीश वासनिक, विभागीय अभियंता सुनील सरपाते, मानस चित्रकार सुनील गजभिये, ग्रंथालय अधीक्षक अल्का गावंडे, ज्येष्ठ नगरसेवक मनोज सांगोळे, नगरसेवक दिनेश यादव, काँग्रेस झोपडपट्टी सेलचे टिंकू कांबळे, सामाजिक कार्यकर्ते अर्जून कोलते, शुभम सांगोळे, कनिष्ठ अभियंता प्रशांत लोहे, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक बाबा श्रीखंडे, नासुप्रचे कनिष्ठ अभियंता टेंभुर्णे, सुमित खोब्रागडे, प्रमोद शेंडे, राहुल नायर आदी उपस्थित होते. यावेळी आयुक्तांसमोर समस्या मांडण्यात आल्या.
वाचनालयातील साहित्य व अन्य बाबींवर यावेळी चर्चा झाली. यानंतर आयुक्त, नासुप्रचे सभापती यांच्या हस्ते पिंपळाचे, कडुनिंबाचे, बकुळीचे झाड लावण्यात आले. यानंतर मौजा नारी खसरा क्र. १०८, १०९ येथील एस.आर.ए. अंतर्गत बनलेल्या इमारतीला भेट दिली. तेथील २४ बाय १८ मीटर रस्त्याची पाहणी केली. नासुप्रच्या जागेवर ३० खाटांचा दोन मजली दवाखाना बनविण्यात येईल असे नासुप्र सभापती सुर्यवंशी यांनी सांगितले.
या परिसरात मुलभूत सुविधा नासुप्रद्वारे देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या कास्तकारांच्या जमिनी रस्त्यामध्ये जाणाऱ्या आहेत अशा कास्तकारांना टी.डी.आर. देऊन त्याचा ताबा घ्यावा, असे निर्देश त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना दिले.