नागपूर: उत्तर भारतीयांसाठी श्रद्धेचा विषय असलेल्या छठपूजेच्या निमित्याने लाखो भाविक शहरातील विविध तलावावर अर्घ्य अर्पण करण्यासाठी एकत्रित येत असतात. त्यामुळे तेथे चोख सुरक्षाव्यवस्था व पायाभूत सुविधा नागपूर महानगरपालिका उपलब्ध करून देत आहे. याच पार्श्वभूमीवर महापौर नंदा जिचकार यांनी सोमवारी (ता.२३) पोलिस लाईन टाकळी येथील तलावाची पाहणी केली व तेथील व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्या समवेत ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, नगरसेविका गार्गी चोपडा उपस्थित होत्या.
यंदा २४ ते २७ ऑक्टोबर दरम्यान हा धार्मिक उत्सव असून २६ ला सायंकाळी आणि २७ ला पहाटे सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करण्यात येणार आहे. यावेळी लाखो नागरिक एकत्रित येणार आहेत. या धार्मिक उत्सवाचे महत्त्व आणि भाविकांची गर्दी लक्षात घेता महानगरपालिकेद्वारे प्रशासनिक तयारी पूर्ण झाली आहे. उर्वरित कामांना गती देण्याचे आदेश, महापौर नंदा जिचकार यांनी यावेळी बोलताना दिले. भाविकांना कुठलाही त्रास होणार नाही याची विशेष काळजी घेण्यात यावी, असेही महापौरांनी निर्देशित केले.
पाहणी दौऱ्याप्रसंगी मुन्ना ठाकूर, प्रमोद ठाकूर, राजेश तिवारी, रितेश सिरपेठ, शैलेश गायकवाड, संजय मोहोड, महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.