नागपूर: पर्यावरणा संवर्धनाबद्दल नागरिकांमध्ये जनजागृती वाढली आहे. कृत्रिम तलावांमध्ये गणेश विसर्जनाला नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. हे लक्षात घेता शहरातील तलावांमध्ये बांधण्यात येणाऱ्या विसर्जनासाठीच्या कृत्रिम तलावांचे बांधकाम गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करा. शहरातील विविध परिसरातील मूर्ती विसर्जनाचे प्रमाण लक्षात घेता कृत्रिम तलावांच्या संख्येत आवश्यकतेनुसार वाढ करा, असे निर्देश महानगरपालिकेचे आयुक्त अश्विन मुदगल यांनी दिले.
शहरातील विविध तलावांजवळ गणेश विसर्जनासाठी मनपा व पोलिस विभागातर्फे करण्यात येणाऱ्या पूर्व तयारीचा आढावा मनपा आय़ुक्तांनी शनिवारी (ता. 29 जुलै) घेतला. विसर्जनाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या सोयी सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश यावेळी आयुक्तांनी दिलेत.
शनिवारी आय़ुक्तांनी गांधीसागर, सक्करदरा, सोनेगाव, अंबाझरी, फुटाळा तलाव येथील सोयीसुविधांचा आढावा घेतला. यावेळी उपायुक्त जयंत दांडेगावकर, पोलिस उपायुक्त (विशेष शाखा) नीलेश भरणे, आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार, पशुचिकित्सा अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, सहायक आयुक्त गणेश राठोड, महेश मोरोणे, राजेश कराडे, कार्यकारी अभियंता (प्रकल्प) नरेश बोरकर, नगरसेविका हर्षला साबळे यांची उपस्थिती होती.
गेल्यावर्षी कृत्रिम तलावांचा झालेला उपयोग, नागरिकांचा मिळालेला प्रतिसाद आणि आलेल्या समस्यांबद्दल यावेळी आयुक्तांनी माहिती जाणून घेतली. तसेच परिसरातील नागरिकांनाही याबद्दल विचारपूस केली. नागरिकांनीही कृत्रिम तलावाचा विसर्जनासाठी वापर करावा, असे आवाहन आयुक्त अश्विन मुदगल यांनी केले. पाहणी दरम्यान तलाव येत असलेल्या हद्दीतील पोलिस ठाण्याच्या ठाणेदारांचीही यावेळी उपस्थिती होती.