मालमत्ता कर वसुलीसंदर्भात झोन निहाय घेतला आढावा
नागपूर : कोव्हिड-१९च्या पार्श्चभूमीवर शहरातील मालमत्ता कर वसुली थांबली होती. मनपाच्या उत्पन्नाचे स्त्रोत कर स्वरूपात मिळणारा महसूल हेच आहे. त्यामुळे आता जास्तीत जास्त कर वसुलीकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्याअनुषंगाने सर्व झोनस्तरावर कार्यवाहीला गती देण्यात यावी व येत्या ३१ ऑगस्टपर्यंत उर्वरित सर्व बिलांचे वितरण पूर्ण करा, असे निर्देश स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांनी दिले.
मालमत्ता कर वसुलीसंदर्भात मंगळवारी (ता.४) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात झोननिहाय आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, माजी स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, उपायुक्त (महसूल) मिलींद मेश्राम, सहायक आयुक्त सर्वश्री विजय हुमने, प्रकाश वराडे, राजू भिवगडे, हरीश राउत, सहायक आयुक्त किरण बगडे, सुषमा मांडगे, साधना पाटील, सहायक अधीक्षक (मालमत्ता कर) गौतम पाटील आदी उपस्थित होते.
प्रारंभी स्थायी समिती सभापतींनी दहाही झोनच्या मालमत्ता कर संबंधी वसुलीचा आढावा घेतला. मालमत्ता कर वसुलीसंदर्भात नगरसेवकांशी समन्वय साधण्यात यावा. झोनस्तरावर नगरसेवकांच्या सहकार्याने प्रभागनिहाय कर आकारणी शिबिर घेण्यात यावेत, असेही त्यांनी यावेळी निर्देशित केले.
यावर्षीचे कर वसुलीचे उद्दिष्ट्ये गाठण्यासाठी प्रत्येक झोनद्वारे त्यासंबंधी कार्यवाहीवर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. ज्या मालमत्तांना वारंवार नोटीस बजावूनही कर भरले जात नाही अशांवर जप्तीची कारवाई करण्यात यावी. या कारवाईपूर्वी नियमानुसार आवश्यक ती सर्व प्रक्रिया राबविण्यात यावी. याशिवाय जप्तीनंतरही जे मालमत्ताधारक कर भरणा करीत नाही त्यांच्या संपत्तीचा लिलाव करण्याचीही प्रक्रिया राबविण्याचे निर्देश स्थायी समिती सभापतींनी दिले.