नागपूर: नागपुरात सध्या खासदार महोत्सव सुरू आहे. शनिवारी २६ मे रोजी खासदार महोत्सवाचा समारोप यशवंत स्डेडियम येथे होणार आहे. या समारोपाच्या पूर्वतयारीचा आढावा महापौर नंदा जिचकार यांनी गुरूवारी (ता.२४) मनपा मुख्यालयातील महापौर कक्षात घेतला.
यावेळी स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, आयुक्त वीरेंद्र सिंह, माजी महापौर प्रवीण दटके, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, सुनील अग्रवाल, क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, मनपाच्या प्रतोद दिव्या धुरडे, उपनेत्या वर्षा ठाकरे, अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, अतिरिक्त उपायुक्त राजेश मोहिते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे विशेष कार्यकारी अधिकारी सुधीर देऊळगावकर, नागपूर मेट्रो रेल्वेचे रवींद्र धकाते, अखिलेश हळवे, पोलिस सहायक आयुक्त (वाहतूक) जयेश भांडारकर प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी बोलताना महापौर नंदा जिचकार यांनी, मुंजे चौकात सुरू असलेल्या मेट्रो रेल्वेच्या बांधकामाला तात्पुरते बंद करण्यात यावे व वाहतुकीसाठी मार्ग खुला करण्याचे निर्देश दिले. मुंजे चौकात उभारण्यात आलेले सेंट्रींग आणि बॅरिकेट्स काढण्यात यावे, असे निर्देश मेट्रो रेल्वेला दिले. यशवंत स्टेडियमकडे जाणारा तो मुख्य मार्ग असल्याने तो वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा, अशी सूचना महापौर नंदा जिचकार यांनी केली.
मॉरीस कॉलेजजवळ मेट्रो रेल्वेचे बांधकाम सुरू आहे. तेही काम दोन ते तीन दिवस थांबविण्यात यावे, असे निर्देश महापौरांनी दिले. धंतोली पोलिस स्टेशन ते मेहाडिया चौक या ठिकाणी सीमेंट रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. त्या ठिकाणी समारोपाच्या दिवशी किमान पायी येणाऱ्यांसाठी तो रस्ता चालू करण्यात यावा, असे निर्देश माजी महापौर प्रवीण दटके यांनी दिले. यशवंत स्टेडियम समोरील मनपाचे अधिकृत वाहन पार्किंग़ समारोपाच्या दिवशी सकाळपासूनच सर्वसामान्य नागरिकांसाठी खुले करण्यात यावे, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले. समारोपीय कार्यक्रमासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी दीनानाथ हायस्कूल, होमगार्ड मैदान, न्यू इंग्लीश हायस्कूल, इंडियन जिमखाना या ठिकाणी वाहन पार्किंगची व्यवस्था करण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.
पटवर्धन मैदान व पंचशील चौक या ठिकाणी स्टार बसेसचे पार्किंग असते. त्या दिवशी पटवर्धन मैदानातील ४० बसेस काढून त्या ठिकाणी व्हीआयपी पार्किंगची व्यवस्था करण्यात यावी आणि समारोपीय कार्यक्रमाच्या पाहुण्यांना घेऊन येणाऱ्या बसेस इंडियन जिमखाना येथे लावण्यात याव्या, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप यांना दिले.
यशवंत स्टेडियममधील अंतर्गत व बाह्य स्वच्छता ही तातडीने करण्यात यावी आणि स्टेडियमचे सर्व १२ ही दरवाजे खुले करण्यात यावे, त्या ठिकाणी काही डागडुजी करावयाची असल्यास तीही करावी, असे निर्देश महापौरांनी दिले. यशवंत स्टेडियम परिसरातील व स्टेडियमकडे जाणारे रस्त्यांवर असलेले खड्डे तातडीने बुजविण्यात यावे, असेही महापौर यावेळी बोलताना म्हणाल्या.
यावेळी बैठकीला धंतोली झोन सहायक आयुक्त राजू भिवगडे, धरमपेठ झोन सहायक आयुक्त महेश मोरोणे, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ.प्रदीप दासरवार, क्रीडा निरिक्षक नरेश चौधरी यांच्यासह संबंधित विभागाचे कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.