मनपाच्या अधिकाऱ्यांसह ९० कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान
चंद्रपूर: पावसाळ्याच्या दिवसात डेंग्यू, मलेरीया आजारांचे रुग्ण शहरात आढळून येतात. अशावेळी रक्ताचा तुटवडा जाणवू नये, यासाठी महापौर राखी संजय कंचर्लावार यांच्या संकल्पनेतून चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिर शृंखलेचा मंगळवारी दि. २८. ला समारोप झाला. बंगाली कॅम्प येथील मनपा झोन ३. कार्यालय येथे चौथे रक्तदान शिबीर पार पडले.
शिबिराला महापौर राखी संजय कंचर्लावार, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, सभागृह नेता संदीप आवारी, बंगाली कॅम्प प्रभाग तीनचे सभापती अली अहमद मन्सूर यांच्यासह झोन अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. त्यापूर्वी मनपा मुख्य प्रशासकीय इमारत, झोन १ महापालिका कार्यालय, नवी प्रशासकीय इमारत येथे रक्तदान शिबिरांचे आयोजन झाले.
या सर्व रक्तदान शिबिरांमध्ये आयुक्त राजेश मोहिते, सहायक आयुक्त विपीन पालीवाल यांच्यासह मनपा कर्मचारी, अधिकारी व नागरिक अशा एकूण सुमारे ९० जणांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेत रक्तदान केले. शहरात डेंग्यूच्या साथी दरम्यान इस्पितळे व रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा पुरवठा कमी पडू नये, या मुख्य हेतूने ही रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली होती. सर्व शिबिरस्थळी मनपाच्या आरोग्य विभागाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार तसेच डॉ. अतुल चटकी आदींसमवेतव आरोग्य कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.