महिला व बालकल्याण समिती सभापतींचे निर्देश : विविध कार्याचा घेतला आढावा
नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समिती तर्फे झोनस्तरावर कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याचे निर्देश महिला व बालकल्याण विशेष समितीच्या सभापती दिव्या धुरडे यांनी दिले. तसेच त्यांनी समिती अंतर्गत शहरात राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा आढावा घेतला. मंगळवारी (ता. १६) मनपा मुख्यालयातील स्व. डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती, स्थायी समिती सभागृहात महिला व बालकल्याण विशेष समितीची सभा पार पडली.
बैठकीत महिला व बालकल्याण विशेष समितीच्या उपसभापती अर्चना पाठक, सदस्या उज्ज्वला शर्मा, निरंजना पाटील, रूपाली ठाकुर, सोनाली कडू, प्रणिता शहाणे, स्नेहा निकोसे, मंगला लांजेवार, उपायुक्त राजेश भगत, सहायक कर संग्रहक दिनकर उमरेडकर, विद्युत सहायक अभियांत्रिकी चंद्रशेखर पाचोडे, कौशल्य विकास व्यवस्थापक विनय त्रिकोलवार, गटाचे व्यवस्थापक प्रमोद खोब्रागडे, रितेश बांते, नुतन मोरे, झोनचे सहायक आयुक्त आदी उपस्थित होते.
बैठकीत दहाही झोनस्तरावर फूड स्टॉल कॅन्टीन सुरू करणे, सन २०१९-२० तसेच २०२०-२१ मध्ये समाजकल्याण विभागाद्वारे आणि महिल्या व बालकल्याण समिती अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचा आढावा, प्रभागात महिलांकरिता प्रशिक्षण, एनयुएलएम अंतर्गत सुरू असलेल्या योजनांची माहिती तसेच नवीन आशा स्वयंसेविकांची निवड करण्याबाबतची माहिती देणे इत्यादी विषय मांडण्यात आले.
यावेळी उपायुक्त राजेश भगत यांनी सांगितले की, समाजकल्याण विभागाद्वारे महिला समुपदेशन केंद्र, लाडली लक्ष्मी योजना, शिलाई मशिन वाटप तसेच महिला उद्याजिका मेळावा इत्यादी उपक्रम राबविले जात आहेत. याशिवाय दिव्यांगांसाठी ट्रायसिकल वाटप (आतापर्यंत ६६ दिव्यांगांना ट्रायसिकलचे वाटप करण्यात आले आहे.), व्यवसाय करण्यासाठी अर्थसहाय्य या योजनेअंतर्गत दोन लाखापर्यंत अनुदान दिले जाते. यात ९१ लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत. ३१ मार्चच्या आधी या सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा केली जाणार आहे, अशी महितीही राजेश भगत यांनी यावेळी दिली.