नागपूर : कोराडीतील प्रस्तावित १ हजार ३२० मेगावॅटच्या प्रकल्पाला पर्यावरणवाद्यांसोबत स्थानिक नागरिक आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विरोध केला आहे. या विरोधाला आता काँग्रेसनेही पाठींबा दिला असून याकरिता काँग्रेसचे शहराध्यक्ष व आमदार विकास ठाकरे हे मैदानात उतरले आहे.
प्रस्तावित वीज प्रकल्पांचे पर्यावरण परिणामकारक मूल्यांकन करण्यात आले असून, २९ मे रोजी दुपारी १२.३० वाजता प्रकल्प कार्यालय परिसरात जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून ही जनसुनावणी करण्यात येणार आहे.
सध्या नागपूर शहरात तापमानाने उच्चांक गाठला आहे. भर उन्हात ही जनसुनावणी होणार असल्याने नागरिकांना उष्णाघाताचाही धोका बघता या जनसुनावणी रद्द करण्याची मागणी विकास ठाकरे यांनी नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना पत्राद्वारे केली. तसेच त्यांनी पत्रता लिहिले की, कोराडीच्या प्रकल्पात सध्या ६६० मेगावॅटचे ३ संच कार्यान्वित असून हे लावतांना महानिर्मितीने प्रदुषण कमी करण्यासाठी फ्लू गॅस डिसल्फ्युरायझेशन (एफजीडी) लावले नाही. त्यामुळे वायू प्रदूषणाचा मोठा धोका निर्माण झाला आहे. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर पडेल. कोराडीतील पूर्वीच्या वीज निर्मिती संचावर एफजीडी लावल्याशिवाय नवीन संच लावू नये, असे विकास ठाकरे यांनी जिल्हाधिकारी इटनकर यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.