नागपूर: राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात सोमवारी 17 मार्चला हिंसक घटना घडल्याने महाराष्ट्राच्या लौकिकाला काळीमा फासला आहे. दगडफेक आणि जाळपोळीची घटना अत्यंत दुर्दैवी असून महाराष्ट्रातील शांतता भंग करण्याचा काही शक्ती प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्रातील शांतता व सामाजिक सौहार्द टिकवणे गरजेचे आहे.
नागपूर शहरात झालेल्या दंगलग्रस्त भागाची पाहणी करून स्थानिकांशी चर्चा करून शांतता प्रस्थापित करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्देशानुसार एक समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीत माजी प्रांताध्यक्ष गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, माजी खासदार हुसेन दलवाई, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, ॲड. यशोमती ठाकूर, आमदार साजिद पठाण हे या समितीचे सदस्य असून नागपूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे हे निमंत्रक तर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव प्रफुल्ल गुडदे पाटील समन्वय आहेत.
काँग्रेसची ही समिती दंगलग्रस्त भागात जाऊन परिस्थितीची पाहणी करेल व शांतता प्रस्थापीत करण्यासाठी प्रयत्न करेल अशी माहिती प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ॲड. गणेश पाटील यांनी दिली आहे. दरम्यान नागपूरच्या महाल भागातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात दुपारी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे आंदोलन झाले. यावेळी औरंगजेबाच्या प्रतिकात्मक कबरीवर हिरवी चादर टाकून जाळली होती अशा अफवा सोशल मीडियावर पसरल्या आणि सायंकाळी दंगल भडकली.
भालदारपुरा आणि हंसापुरी परिसरात अनेक वाहनांची जाळपोळ करण्यात आली. शंभरहून अधिक वाहनांची तोडफोड झाली. दंगलखोरांनी पोलिसांवर दगडफेक केली. या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले.