कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत दीर्घकाळ काम केले, प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांचे काम चांगले होते. त्यांच्यासारखा नेता जर दुखावत असेल तर कॉंग्रेस पक्षाला आत्मचिंतनाची गरज आहे. कॉंग्रेस हे बुडते जहाज असून त्यात कुणीही चढायला तयार नाही.उलट भाजपात मोठ्या प्रमाणात कॉंग्रेसमधून पक्षप्रवेश होत आहेत,”अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
भाजपा प्रदेश कार्यालयात ते माध्यमांशी बोलत होते. कॉंग्रेसमध्ये नेते आपल्या मुलांना प्रोजेक्ट करण्यात व्यस्त असून सामान्य व पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांकडे लक्ष नाही. यामुळे ते जर भाजपात आले त्यांना त्यांच्या उंचीपेक्षा अधिक उंचीवर पक्षासाठी काम करण्याची संधी दिली आहे. तथापि, बाळासाहेब थोरात यांना कुठलीही ऑफर देणार नाही व कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना कोणताही सल्ला देणार नाही असेही ते म्हणाले.
श्री. बावनकुळे म्हणाले, सत्यजित तांबे यांनी भाजपात येण्याविषयी प्रस्ताव दिलेला नाही. त्यांच्याशी चर्चा झाली नाही. ते अपक्ष उमेदवार होते. एक चांगला कार्यकर्ता विधीमंडळात येत असेल तर स्थानिक नेत्यांनी त्यांच्या पातळीवर मदत केली. परंतु सत्यजित तांबे यांना वाटत असेल तर त्यांना कधीही भाजपात प्रवेश देऊ त्यांच्यासाठी दरवाजे उघडे आहेत.
कसबा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याचा निर्णय भाजपाच्या केंद्रीय पार्लेमेंट्री बोर्डाचा आहे. पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपाकडून विनंती केली असून ती उमेदवारी अर्ज परत घेण्यापर्यंत असेल. शैलेश व कुणाल टिळक यांची भेट घेतली असून त्यांच्या कोणतिही नाराजी नाही. कसबा व चिंचवडमध्ये भाजपाचाच विजय होणार असल्याचे श्री. बावनकुळे म्हणाले.
अडीच वर्ष सत्ता असताना काहीच काम केले नाही. विरोधकांकडून नकारात्मक नॅरेटिव्ह तयार केला जात आहे असे सांगून श्री बावनकुळे म्हणाले, मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणासाठी व महाराष्ट्राला क्रमांक एक व्हावा यासाठी प्रयत्न करीत आहेत. विकासाची माहिती जनतेला व्हावी यासाठी जाहीर सभा घ्याव्या लागतात. आदित्य ठाकरे राष्ट्रीय नेते असून ते बिहारमधूनही लढतील असाही टोला त्यांनी लगावला.