नागपूर : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची लगबग सुरु असताना काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे माजी मंत्री अनिस अहमद यांनी तिकीट न मिळाल्यानं पक्षाचा राजीनामा दिला असून त्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला. ते आता ‘वंचित’कडून मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. ‘वंचित’चे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थित त्यांनी पक्षाचा झेंडा हाती घेतला.
अनिस अहमद यांनी यापूर्वी सलग तीन वेळा मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. ते यंदाही या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास आग्रही होते. पण, काँग्रेस पक्षाने मागील विधानसभा निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले बंटी शेळके यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. त्यामुळे नाराज होत अहमद यांनी पक्षाचा राजीनामा देण्याच्या निर्णय घेतला.
विदर्भातील काँग्रेसचा मुख्य मुस्लीम चेहरा अशी अहमद यांची ओळख होती. गांधी घराण्याचे निकटवर्तीय म्हणून देखील ते प्रसिद्ध होते. विलासराव देशमुख आणि अशोक चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून देखील काम केले आहे. अहमद यांच्या बंडखोरीचा महाविकास आघाडीला नागपूर मध्य, नागपूर उत्तर, नागपूर दक्षिण आणि कामठी या मतदारसंघात फटका बसू शकतो. या सर्व मतदारसंघात मुस्लीम मतदारांची संख्या मोठी आहे.
दरम्यान मुस्लीम समुदायातील 99 टक्के मतं काँग्रेसला मिळतात. पण, त्यानंतरही पक्षाकडून त्यांच्याकडे दुर्लक्ष होते. लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसने एकाही मुस्लीम उमेदवार दिला नव्हता. विधान परिषदेच्या निवडणुकीतही तीच परिस्थिती होती. संपूर्ण समाजाला प्रतिनिधित्व हवं असल्याने आपण बंडखोरी करत असल्याची प्रतिक्रिया अहमद यांनी व्यक्त केली