नागपूर : महाराष्ट्रात विधानसभेचा निकाल जाहीर झाला असून यात भाजपप्रणित महायुतीला मोठे यश मिळाले. तर महाविकास आघाडीला अपयशाला समोर जावे लागले. हे पाहता महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित केली जात आहे.
अनेक नेत्यांकडून ईव्हीएम तपासणीसाठी अर्ज करण्यात येत आहे. दक्षिण नागपूरचे उमेदवार गिरीश पांडव यांनी देखील ईव्हीएम तपासणीसाठी अर्ज केला. याकरिता त्यांनी तीन लाख रुपये भरले.
पांडव यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदवली आहे. मात्र, नागपूर जिल्ह्यातून केवळ पांडव यांनीच ईव्हीएम आणि व्हीव्हीपीपॅटमध्ये नोंदवलेल्या मतदानाचा डेटा म्हणजेच मेमरी व्हेरिफिकेशनशी जुळण्याची विनंती अर्ज निवडणूक आयोगाकडे केला. पांडव यांनी सात ईव्हीएम आणि व्हीव्हीपीपॅटच्या पडताळणीसाठी अर्ज केला आहे. त्यासाठी त्यांनी तीन लाख रुपये जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केले आहेत. नागपूर जिल्ह्यातील १२ पैकी केवळ तीन ठिकाणी काँग्रेस विजयी झाली आहे.
दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून विरोधकांकडून वारंवार ईव्हीएमच्या माध्यमातून निवडणुका न घेण्याची मागणी करण्यात येत आहे.ईव्हीएमच्या विरोधात विरोधकांसह विविध संघटनांनी अनेकदा आंदोलनाचा पवित्रा घेत बॅलेट पेपरवर मतदान करण्याची मागणी केली.