नागपूर : काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष व आमदार नाना पटोले यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना महाविकास आघाडीत येण्याचा प्रस्ताव दिला. सोबतच त्यांनी दोन्ही नेत्यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली आहे.
एकनाथ शिंदे आधीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री होते. त्यांची नव्या सरकारचं नेतृत्व करण्याची इच्छा होती. तसेच अजित पवारांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे. याच पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी हे वक्तव्य केले.
एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची गत फार वाईट आहे. आपल्या पक्ष टिकेल की नाही अशी त्यांची अवस्था आहे, किंवा त्यांच्या मनात भीती आहे. ही भारतीय जनता पार्टी त्यांना जगू देणार नाही. कारण भाजपाची ती सवयच आहे. देशात त्यांनी जिथे-जिथे, ज्या-ज्या पक्षांबरोबर युती केली त्या सर्वांना भाजपाने संपवून टाकले. आता तुम्ही पाहतच आहात की भाजपाने एकनाथ शिंदे यांच्या सर्व योजना बंद केल्या आहेत. त्यामुळे मला वाटते की आता एकनाथ शिंदे व अजित पवार या दोघांनी सतर्क व्हायला हवं. त्यांनी महाविकास आघाडीत यावे, असे पटोले म्हणाले.