नागपूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये १५० कोटींपेक्षा जास्त रकमेचे सरकारी रोखे खरेदी घोटाळ्याच्या आरोपाखाली नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेले काँग्रेस नेते सुनील केदार यांना विविध अटींसह हायकोर्टाने मंगळवारी जामीन मंजूर केला. बुधवारी दुपारी कारागृहातून बाहेर पडल्यावर केदार यांनी समर्थकांसह शहरात शक्तिप्रदर्शन केले. या रॅलीत मोठ्या प्रमाणावर मोठ्या कार होत्या व त्यामुळे वाहतूक कोंडीदेखील निर्माण झाली होती.यांची गंभीरता लक्षात घेता पोलिसांनी या प्रकरणात केदार व इतर आरोपींविरोधात आणखी एक गुन्ह्याचे कलम वाढविले आहे.
त्याचप्रमाणे रॅलीत सहभागी झालेली दहाहून अधिक चारचाकी वाहने जप्त केली असून, इतर वाहनचालकांचा शोध सुरू आहे. आता पोलिसांकडून या प्रकाराचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे काँग्रेस नेते सुनिल केदारांच्या अडचणीत वाढ होणार असल्याची चर्चा सुरु आहे.
दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी केदार समर्थकांना महत्त्वाच्या सूचना दिल्या होत्या. मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केले.पोलिसांनी याची दखल घेत केदार यांच्यासह जि. प.चे माजी उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, रवींद्र चिखले, जि. प. उपाध्यक्ष कुंदा राऊत, जि. प. सभापती अवंतिका लेकुरवाळे, अनिल राय, संजय मेश्राम आणि विष्णू कोकड्डे यांच्यावरही गुन्हा दाखल केला होता.
अपर पोलिस आयुक्त प्रमोद शेवाळे याबाबत बोलतांना म्हणाले की,परवानगी नाकारली असताना देखील रॅली काढणे, कारागृहाच्या संवेदनशील भागात घोषणाबाजी करणे, वाहतुकीची कोंडी निर्माण करणे तसेच सामाजिक सलोखा बिघडविण्याचा आरोप केदार व त्यांच्या समर्थकांवर लागले आहेत.या प्रकरणाची पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे. चौकशी झाल्यावर याचा विस्तृत अहवाल न्यायालयाकडे सादर करण्यात येईल.