चंद्रपूर : एकीकडे विधानसभेतील विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार लवकरच काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. तर दुसरीकडे त्यांच्या समर्थकांनी भाजपचा झेंडा हाती घेतल्याने काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली.
मंगळवारी, वडेट्टीवार यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे अनेक नेते भाजपमध्ये सामील झाले.मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्वांना पक्षाचे सदस्यत्व दिले.
भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांमध्ये गेल्या ५० वर्षांपासून काँग्रेसशी संबंधित असलेले भैया कुटुंबातील अशोक भैयाजी यांचे पुत्र गौरव अशोक भैयाजी, नगर परिषदेचे माजी गटनेते विलास विचार, नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष डॉ. सतीश कवळे, माजी पंचायत समिती सभापती नामदेव लांजेवार, सुरेश दरवे आणि इतर अनेक जणांनाच समावेश आहे.
बावनकुळे यांनी सर्व नवीन सदस्यांना भाजप सदस्य नोंदणी मोहिमेत सामील होण्याचे, प्रमुख नेत्यांना सक्रिय सदस्य बनवण्याचे आणि भाजप संघटनेचा विस्तार करण्याचे आवाहन केले. पक्ष संघटना नेहमीच तुमच्या पाठीशी उभी राहील, असेही बावनकुळे म्हणाले.