नागपूर: औरंगजेबाच्याकबरीवरून राज्यातील राजकारण तापले आहे. राज्यात कबर हटवण्याच्या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने आंदोलन करण्यास सुरुवात केली. छत्रपतींसह हिंदू संघटनांनी या मागणीला पाठिंबा दिला आहे. दरम्यान, विरोधी पक्ष सतत याचा विरोध करत आहे. काँग्रेसने या मागणीला विरोध केला. विहिंप आणि बजरंग दलाला करण्यासारखे काहीही उरलेले नाही.
त्यांना महाराष्ट्रातील लोकांना शांततेत राहू द्यायचे नाही. औरंगजेब आपल्या हयातीत 27 वर्ष महाराष्ट्रात राहिलाय. तेव्हा तो महाराष्ट्राचं काही बिघडवू शकला नाही. तर मृत्यूनंतर त्याची कबर खोदल्याने आपले काय होणार आहे? असा सवालही विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
दुसरीकडे काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते अतुल लोंढे पाटील यांनीही या मुद्द्याचा विरोध केला. महाराष्ट्रातील परिस्थिती तणावपूर्ण आहे. कायदा आणि सुव्यवस्था कोलमडली आहे. वीज आणि पाण्याअभावी शेतकरी आत्महत्या करत आहेत. बेरोजगारी वाढली आहे.
हे सर्व प्रश्न लपवण्यासाठी भाजप हिंदू-मुस्लिमचे नवे मुद्दे आणते. त्यांनी लोकांना पीएफ आणि पेन्शन योजनांमधून काढून शेअर बाजारात टाकले आणि आता अवघ्या ५ महिन्यांत सामान्य माणूस गरीब झाला आहे. मुख्य मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी लोकांना ऐतिहासिक विषयांमध्ये अडकवले जात आहे. यावेळी लोक त्यांच्या जाळ्यात अडकणार नाहीत. त्यांना खऱ्या मुद्द्यांवर चर्चा करावी लागेल,असे अतुल लोंढे पाटील म्हणाले.