नागपूर: छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करणारा आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी देणारा प्रशांत कोरटकर तेलंगणात लपून बसला होता. पोलिसांनी त्याला सोमवारी (२४ मार्च) अटक केली. आज त्याला कोल्हापूर न्यायालयात हजर केले जाणार आहे. यावर भाजप आमदार परिणय फुके यांनी मोठा दावा केला आहे. प्रशांत कोरटकर तेलंगणातील एका काँग्रेस नेत्याच्या घरात लपून बसला होता. महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनीही त्यांना तिथे जाण्यास मदत केल्याचा दावा फुके यांनी केला.
परिणय फुके म्हणाले, सुरक्षा काढून घेतल्यानंतर चार-पाच दिवसांत प्रशांत कोरटकर यांना अटक करण्यात आली आहे. ते तेलंगणातील एका काँग्रेस नेत्याच्या घरात लपून बसले होते. त्यामुळे काँग्रेस त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते. पण मी सर्वांना आश्वासन देतो की आमचे सरकार त्याला कठोर शिक्षा देईल.
आमदार परिणय फुके काय म्हणाले?
प्रशांत कोरटकर हे तेलंगणातील एका काँग्रेस नेत्याच्या घरात लपून बसला होता. त्याला एका काँग्रेस नेत्याने आश्रय दिला होता. माझा आरोप आहे की महाराष्ट्रातील काँग्रेस नेते यामध्ये सहभागी आहेत. येथील काही नेत्यांनी कोरटकर यांना तेलंगणाला कसे नेण्यात आले हे सांगितले. ज्या लोकांनी त्यांना गडचिरोली मार्गे तेलंगणाला कसे नेण्यात आले याची माहिती दिली तेच लोक यात सहभागी आहेत. हे सर्व महाराष्ट्रातील वातावरण बिघडवण्यासाठी केले जात आहे. हा काँग्रेसचा प्रयत्न आहे. पक्ष एक महिना कोरटकरांना संरक्षण देत होता. काँग्रेसचा प्लॅन महायुती सरकारला बदनाम करण्याचा होता.
कोरटकर हे काँग्रेसशासित राज्यातील एका काँग्रेस नेत्याच्या घरी सापडले आहेत. यामध्ये कोणाचा सहभाग होता हे तपासात उघड होईल. त्यांच्या कॉल रेकॉर्डिंगच्या चौकशीतून आणखी काही सत्य समोर येईल, असेही फुके म्हणाले.