सोलापूर : माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे व आ. प्रणिती शिंदे या भाजपात गेल्याशिवाय राहणार नाहीत असा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सोलापुरात प्रसार मध्यमांशी बोलताना केला. वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांची काल सोलापुरात सभा झाली. आज सकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत भाजपवर हल्ला केला.
लोकसभा निवडणूक झाली की सुशीलकुमार शिंदे भाजपवासी होतील, असेही ते म्हणाले.
सोलापूरचे कॉग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांची चौकशी लागेलेली आहे. त्यामुळे ते भाजपत जातील. माझ्या माहितीप्रमाणे शिंदे यांची चौकशी थांबवलेली आहे. ही चौकशी थांबवण्यासाठी शिंदे भाजपामध्ये जातील. संविधान बदलेल अमुक बदलेल याच्याशी त्यांना काही देणे घेणे नाही.त्यांनी जमवलेली माया वाचवणे एवढेच त्यांचे टार्गेट आहे, अशी टीका आंबेडकर यांनी केली.
संविधान बदलणे हा भाजपाचा प्लॅन आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या पतीने दिलेल्या मुलाखतीत संविधानावर भाष्य केले होते. त्या मुलाखतीमध्ये त्यांनी भाजपा सत्तेत आला तर संविधान रद्द करतील असे सांगितले होते.यावरून वादंग उठले आहे. यावर पंतप्रधान मोदी सातत्याने संविधान बदलणार नाही असे सांगत आहे. मात्र संविधान बदलणे हा भाजपाचा गेम प्लॅन असल्याचा घणाघात आंबेडकर यांनी केला.