नागपूर : काँग्रेसच्या नागपुरात सुरु असलेल्या बैठकीत अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. पूर्व विदर्भ लोकसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीत काँग्रेसमधील दोन गट एकमेकांना चांगलेच भिडल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
काँग्रेस कार्यकर्त्यांत झालेल्या राड्यावेळी मंचावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी खासदार विलास मुत्तेमवार यांच्यासह काँग्रेसचे माजी मंत्री, आमदार स्थानिक नेते उपस्थित होते.
काँग्रेसचे नागपूर शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे हे भाषण संपवत असताना काँग्रेसचे पदाधिकारी नरेंद्र जिचकार यांच्यासोबत वाद झाला. हा वाद इतका चिघळला की दोन्ही बाजूकडील समर्थकांमध्ये बाचाबाची झाली.
दरम्यान नागपूर शहर काँग्रेसची महत्त्वाची बैठक आज आयोजित करण्यात आली होती.या ठिकाणी महत्वाचा आढावा घेण्यात येणार होता. नागपूरच्या सहा मतदार संघांचा आढावा या ठिकणी घेतला जाणार होता. पण भाषण करण्यावरून दोन नेत्यांमध्ये वाद झाल्याने वातावरण चिघळले.