नागपूर:सुरेंद्रगड वासियांची अनेक वर्षांपासूनची मागणी अखेर पूर्ण झाली असून, २१ एप्रिलपासून गुप्ता चौक ते सदर दरम्यान सिटी बस सेवा सुरू करण्यात आली आहे. सुरेंद्रगड ही मोठी वस्ती असूनही येथे सार्वजनिक वाहतुकीचा अभाव होता. त्यामुळे येथील नागरिकांना गिट्टीखदान व वेटरनरी कॉलेज चौकापर्यंत पायी जावे लागत होते. विशेषतः जेष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांना यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.
या गरजांची दखल घेत आमदार विकास ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली दीपक वानखेडे व युगल विदावत यांनी महानगरपालिका परिवहन विभागाशी संपर्क साधून ही सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यानंतर अथक मेहनतीनंतर अखेर सुरेंद्रगड गुप्ता चौक येथून बस सेवा सुरू झाली आहे.
ही बस भुवनेश्वरी माता मंदिर, भवानी चौक, विधि भूषण, केटी नगर, गिट्टीखदान व सदर मार्गे पुढे जाईल. या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांनी दीपक वानखेडे व युगल विदावत यांचे मन:पूर्वक आभार मानले आहेत.