– काँग्रेसचे खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांनी वयाच्या ४७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. दिल्लीतील मेदांता रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. बाळू धानोरकर यांच्या मागे च्या पश्चात पत्नी वरोराच्या आमदार प्रतिभा धानोरकर, दोन मुले, आई, भाऊ भद्रावतीचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर, बहीण व बराच मोठा आप्त परिवार आहे.
बाळू धानोरकर हे चंद्रपूरचे काँग्रेसचे खासदार होते. काँग्रेसचे राज्यातील ते एकमेव खासदार होते. काही दिवसांपासून बाळू धानोरकर आजारी होते. नागपुरात खासगी रुग्णालयात त्यांच्यावर किडनी स्टोन शस्त्रक्रियाही झाली. शस्त्रक्रियेदरम्यान गुंतागुंत वाढल्याने २८ मे रोजी त्यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे एअर अॅम्ब्युलन्सद्वारे त्यांना नागपूरहून दिल्लीत उपचारांसाठी हलवण्यात आले. दिल्लीत त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. आज पहाटेच उपचारांदरम्यान त्यांचे निधन झाले.
खासदार बाळु धानोरकर यांचे पार्थिव वरोरा येथील निवासस्थानी दुपारी २ ते ४ वाजेपर्यंत अंतिम दर्शनाकरिता ठेवण्यात येणार आहे. अंतिम संस्कार वरोरा येथील वणी बायपास स्मशानभूमी येथे होईल.