नागपूर : काँग्रेस पक्षाच्या १३८ व्या स्थापना दिनानिमित्त नागपुरात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस रॅली आणि सभेच्या मध्यमातून ‘शक्तिप्रदर्शन’ करणार आहे. सभेदरम्यान व्यासपीठावर पाचशेहून अधिक नेते, मुख्यमंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारी उपस्थित राहतील. महाराष्ट्रासह तेलंगणा, छत्तीसगड आणि मध्यप्रदेश या शेजारच्या राज्यातून कार्यकर्ते, नागरिक सभेत सहभागी होण्यासाठी नागपुरात दाखल झाले.
सभेसाठी काँग्रेसचे बडे नेते नागपुरात दाखल झाले .उमरेड मार्गावरील दिघोरी नाक्याजवळ असलेल्या एका खासगी बांधकाम कंपनीच्या सुमारे २४ एकर जागेवर ही सभा होत आहे.
या सभेला येणाऱ्यांच्या वाहनांची व्यवस्था आऊटर रिंगरोडच्या जवळच्या विहीरगाव, पाचगाव आणि कळमन्यात करण्यात आली आहे. शेजारील राज्यातून येणारी वाहने आऊटर रिंगरोडकडून येणार आहेत. त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेवर त्याचा परिणाम होणार नाही.
काँग्रेस फुंकणार लोकसभेचे रणशिंग :
काँग्रेसच्या १३८ व्या स्थापना दिनानिमित्त गुरुवारी नागपुरात ‘हैं तैयार हम’ ही महारॅली होत आहे. बहादुरा येथील ‘भारत जोडो मैदाना’वर दुपारी दोन वाजता होणाऱ्या या महामेळाव्यात काँग्रेस लोकसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहे.