नागपूर : नागपूर: काँग्रेसने रामटेक लोकसभा मतदारसंघातून रश्मी बर्वे यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र जात वैधता पडताळणी समितीने बर्वे यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द केल्याने त्या लोकसभा निवडणूक लढू शकणार नाही. हे पाहता काँग्रेसने रामटेक मतदासंघासाठी अगोदरच ‘प्लॅन बी’ तयार केला होता. रामटेकमधून काँग्रेसने दर्शनी स्वानंद धवड यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. जात वैधता प्रमाणपत्रावर घेतलेल्या आक्षेपवर बर्वे यांनी कायदेशीर लढाई लढण्याचा निश्चय केला होता. मात्र आता जात पडताळणी समितीने घेतलेल्या निर्णयानंतर बर्वे लोकसभा निवडणूक लढणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
रामटेक हा लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी राखीव ठेवला गेला आहे. परंतु रश्मी बर्वे यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाल्यामुळे त्यांची उमेदवारी धोक्यात आली. पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत काल (२७ मार्च) संपली. मात्र काँग्रेस पक्षाकडून आगोदरच पर्यायी उमेदवार म्हणून दर्शनी स्वानंद धवड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे आता रामटेक मतदासंघातून रश्मी बर्वे नाही तर दर्शनी स्वानंद धवड लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.
दरम्यान दर्शनी स्वानंद धवड नागपूर महानगर पालिकेत प्रभाग १२च्या नगरसेवक होत्या.