नागपूर : लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होताच महाराष्ट्रात महाविकास आघाडीने ३० जागा जिंकल्या आहेत. त्यामध्ये सर्वाधिक जागा या काँग्रेसने पटकावल्या असून काँग्रेसच्या या यशामध्ये विदर्भाचा मोठा वाटा आहे. विदर्भात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने मुसंडी मारली असून एकूण १० पैकी सात जागांवर आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत. यात पाच जागा जिंकून काँग्रेसने आपले वर्चस्व प्रस्थापित केले. याठिकाणी महायुतीच्या पदरी केवळ तीन जागाच पडल्या.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाने बुलढाणा व यवतमाळ-वाशीम अशा दोन जागा लढवल्या होत्या. त्यापैकी यवतमाळ-वाशीम मतदार संघातून ठाकरे गटाचे संजय देशमुख यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी शिंदे गटाच्या राजश्री पाटील यांचा ७० हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. तर विदर्भात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने एकच जागा लढवली होती. वर्ध्यातून या पक्षाचे अमर काळे यांनी भाजपचे विद्यामान खासदार रामदास तडस यांचा पराभव केला.भाजपला सातपैकी नागपूर, अकोला या दोनच जागा जिंकता आल्या. नागपूरमधून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेसचे विकास ठाकरे यांचा एक लाखाहून अधिक मतांनी पराभव केला.
काँग्रेसच्या ‘या’ उमेदवारांनी मारली बाजी –
चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांनी भाजप नेते व विद्यामान वन व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा दोन लाखांहून अधिक मतांनी पराभव केला. गडचिरोलीमध्ये काँग्रेसचे नामदेव किरसान यांनी भाजपचे खासदार अशोक नेते यांचा, भंडारा-गोंदियामध्ये काँग्रेसचे प्रशांत पडोळे यांनी भाजपचे खासदार सुनील मेंढे यांचा, तर रामटेकमध्ये काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे यांनी शिवसेना शिंदे गटाचे राजू पारवे यांचा पराभव केला. अमरावतीमध्ये भाजपच्या नवनीत राणा यांचा काँग्रेसचे बळवंत वानखेडे यांनी पराभव केला.
‘मविआ’त कोणत्या पक्षाला किती जागा?
राज्यात महाविकास आघाडीला 30 जागा मिळाल्या असून त्यामध्ये 13 जागा काँग्रेसला मिळाल्या आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना ठाकरे गट असून त्यांना 9 जागा मिळाल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर शरद पवारांची राष्ट्रवादी असून त्यांना 8 जागा मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीने फक्त 10 जागा लढवल्या असून त्यापैकी आठ जागांवर विजय मिळवला आहे.