नागपूर : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीने डिसेंबरच्या अखेरपर्यंत जागावाटपाची डेडलाईन निश्चित केली होती. पण अद्याप जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर करण्यात आलेला नाही. एबीपी सी व्होटरच्या सर्वेक्षणानुसार राज्यात महाविकास आघाडीला २६ ते २८ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर सत्ताधारी महायुतीला १९ ते २१ जागा मिळू शकतात. त्यामुळे महाविकास आघाडीची बाजू मजबूत आहे. यातच आगामी निवडणुकांसाठी काँग्रेसने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.
काँग्रेसने राज्यातील सर्वच्या सर्व ४८ जागांसाठी तयारी सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. उद्धव ठाकरे गटाने २३ जागांची मागणी केलेली असताना, वंचित बहुजन विकास आघाडी १२ जागांसाठी आग्रही असताना काँग्रेसनं ४८ जागांवरील इच्छुकांची नावं मागवली आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत खळबळ निर्माण झाली. लोकसभा निवडणूक इच्छिणाऱ्या नेत्यांनी आपापली नावं द्यावीत, असे आदेश काँग्रेसच्या वरिष्ठांकडून देण्यात आले आहे.
नुकतेच महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी ३ जानेवारीला नवी दिल्लीत पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि खासदार राहुल गांधींची भेट घेतली. यानंतर पटोलेंनी राज्यातील सर्व शहर आणि जिल्हा अध्यक्षांना इच्छुक उमेदवारांची नावं पाठवण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढवणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.