नागपूर : आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराचे वारे वाहू लागले आहे. नुकतेच काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी थेट भाजपात प्रवेश केला. त्यांना भाजपाने राज्यसभेची उमेदवारी दिली.
चव्हाण यांच्या भाजपाप्रवेशानंतर काँग्रेसचे अनेक नेते आणि आमदार भाजपात जाणार आहेत, असा दावा केला जातो. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या नंतर माजी मंत्री आणि भाजपाचे नेते परिणय फुके यांनी मोठे विधान केले. लवकरच काँग्रेसचे १६ ते १७ आमदार भाजपात प्रवेश करणार , असा दावा त्यांनी केला.
मला असे वाटते की अशोक व्हाण यांच्यानंतर काँग्रेसचे १६ ते १७ आमदार भाजपात प्रवेश करतील. यासंदर्भात अशोक चव्हाण यांच्यासोबत अनेक बैठका झाल्या आहेत. त्यामुळे अशोक चव्हाण यांच्यासोबत जे-जे होते ते भाजपमध्ये जाणार असे, फुके म्हणाले.
दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावर भाष्य केले. काँग्रेसकडून मात्र आमचा एकही आमदार फुटणार नाही, असा दावा केला जात आहे. एक नेता गेला म्हणजे पूर्ण पक्ष संपला असे होत नाही. आमचे सर्व आमदार आमच्या संपर्कात आहेत. आमचा पक्ष सोडून कोणीही जाणार नाही, असे पटोले म्हणाले आहेत.