नागपूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नागपूर उत्तर मतदारसंघातील लढतीतून चार उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे उत्तर नागपुरात काँग्रेसचे नितीन राऊत तर भाजपच्या मिलिंद माने यांच्यात लढत होणार असल्याचे खरे चित्र स्पष्ट झाले आहे. तरी देखील मतदारसंघात या दोन्ही नेत्यांना टक्कर देण्यासाठी २६ जण निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. इतकेच नाही तर यावेळी काँग्रेससमोर बसप उमेदवार मनोज सांगोळे यांचे आव्हान आहे.
येथील वॉर्डात पंधरा वर्षापासून नगरसेवक पदावर आरूढ होत विकासकामे करणारे अशी ओळख मनोज सांगोळे यांची आहे. मात्र आमदार होण्यासाठी ते बसपच्या अंबारीवर स्वार झाले.
दोन दिवसांपूर्वी बसपचे बुद्धम राऊत यांना उमेदवारी दिली होती. त्यांनाही पक्षाने एबी फार्म दिले. मात्र अचानक बसपने बुद्धम राऊत ऐवजी मनोज सांगोळे यांना एबी फार्म मिळाले असा दावा त्यांनी केला. यामुळे बसपचे दोन अर्ज दाखल होण्याची जोरदार चर्चा उत्तरच्या राजकीय वर्तुळात आहे.
२०१९ मध्ये थेट लढतीमध्ये नितीन राऊत यांनी ८६ हजार ८२१ मते घेत २० हजारांच्या फरकाने निवडून आले. २०२४ मध्ये मनोज सांगोळे यांचा दांडगा जनसंपर्क असल्याने २०१४ सालची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. कारण भाजपकडून २०१४ मध्ये डॉ. मिलिंद माने रिंगणात होते. तर काँग्रेसचे डॉ. नितीन राऊत उमेदवार होते.
दोघांमध्ये थेट लढत होती, मात्र बसपच्या सोशल इंजिनिअरिंगचा प्रभाव पडला आणि उमेदवार किशोर गजभिये यांच्या पारड्यात मोठ्या प्रमाणात आंबेडकरी मत पडले होते. यामुळे दुसऱ्या क्रमांकावर ते होते.