नागपूर: नागपूर शहर पोलीस दलातील पोलीस हवालदार हर्षदीप बैजनाथ खोब्रागडे यांची अखिल भारतीय पोलीस टेबल टेनिस स्पर्धा 2024-2025 मध्ये निवड झाली आहे. शहर पोलीस दलासाठी ही अभिमानाची बाब आहे. ही स्पर्धा कोच्ची, केरळ येथे 11 एप्रिल 2025 ते 15 एप्रिल 2025 दरम्यान होणार आहे. खोब्रागडे यांची संघाच्या कर्णधारपदी देखील निवड करण्यात आली आहे.
या स्पर्धेत टिम इव्हेंट, सिंगल्स, पुरुष डबल्स आणि मिक्स डबल्स या गटांमध्ये हवालदार हर्षदीप खोब्रागडे सहभागी होणार आहेत. यापूर्वी त्यांनी नागपुरात पार पडलेल्या अखिल भारतीय पोलीस टेबल टेनिस स्पर्धा 2023-2024 मध्ये टिम इव्हेंट, सिंगल्स, डबल्स आणि मिक्स डबल्स या सर्व प्रकारांमध्ये क्वार्टर फायनलपर्यंत मजल मारली होती
हर्षदीप खोब्रागडे यांनी अल्पावधीतच नांदेड, परभणी, वाशिम, ठाणे, धुळे आणि पुणे येथील उत्कृष्ट टेबल टेनिस खेळाडूंचा शोध घेत त्यांना या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी तयार केले. त्यांच्या या मेहनतीला पोलीस दलाकडूनही पाठबळ मिळाले. नागपूर शहराचे पोलीस आयुक्त मा. रविंद्रकुमार सिंघल यांनी त्यांना सरावासाठी आवश्यक क्रीडा साहित्य आणि इतर सुविधा पुरवून त्यांचे मनोबल वाढवले.
या संधीबाबत प्रतिक्रिया देताना हवालदार हर्षदीप खोब्रागडे म्हणले की, या स्पर्धेत महाराष्ट्र संघ उत्तम कामगिरी करेल आणि पदक पटकावेल, याची मला पूर्ण खात्री आहे. त्यांच्या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे, तसेच नागपूर पोलीस दलाचा हा खेळातील गौरव असल्याचे मानले जात आहे.