नागपूर : महावितरणने ग्राहकांना अत्याधुनिक सुविधा देताना त्या जास्तीत जास्त ऑनलाईन देण्याचा नेहमीच जाणीवपूर्वक प्रयत्न केला आहे. ऑनलाईन सुविधेमुळे ग्राहकांना जलद,सुलभ व त्यांच्या सोयीने वीज बिलांचा भरणा करता येते. याशिवाय अशा ऑनलाईन वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांना प्रोत्साहन मिळावे म्हणून महावितरणकडून या ग्राहकांना त्यांच्या वीज बिलावर प्रोत्साहनपर सवलतही दिली जाते. मागील वर्षभरात नागपूर परिमंडलात ऑनलाईन वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांना महावितरणने तब्बल दीड कोटीची सवलत दिली आहे.त्यामुळे जास्तीतजास्त ग्राहकांनी ऑनलाईन वीज बिल भरावे असे आवाहन महावितरणने केले आहे.
नागपूर परिमंडलात २०२१-२२ या वर्षातऑनलाइनच्या माध्यमातून वीज बिलांचा भरणा करणाऱ्या ३९ लाख १४ हजार ८९७ ग्राहकांना १ कोटी ४६ लाख २३ हजार ३१७ रुपयांची सवलत मिळाली आहे. सवलत प्राप्त करणाऱ्या ग्राहकांमध्ये नागपूर शहर मंडल अंतर्गत सर्वाधिक २८ लाख ,नागपूर ग्रामीण मंडल मधील ६ लाख तर वर्धा मंडल मधील ५ लाख ग्राहकांचा समावेश आहे. नागपूर शहर मंडल अंतर्गत सर्वाधिक २७ लाख ग्राहकांना १ कोटी १२ लाखाची ,नागपूर ग्रामीण मंडल मधील ६ लाख ग्राहकांना १९ लाख तर वर्धा मंडल अंतर्गत ५ लाख ग्राहकांना सुमारे १५ लाखाची सवलत मिळाली आहे.
ऑनलाईन बिल भरण्यासाठी ग्राहकांना www.mahadiscom.in ही वेबसाईट तसेच मोबाईल अँप ची सुविधा उपलब्ध आहे. यावर चालू व मागील वीजबिल पाहणे आणि त्याचा ‘ऑनलाईन’ भरणा करण्यासाठी नेटबॅकींग, क्रेडीट/डेबीट कार्डासह मोबाईल वॅलेट व कॅश कार्ड्सचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. या शिवाय लघुदाब वीजग्राहकांसाठी ‘ऑनलाईन’ बिल भरतांना दरमहा ५०० रुपयांच्या मर्यादेत ०.२५ टक्के सूट देण्यात येत आहे. क्रेडीट कार्ड, डेबीट कार्ड, युपीआय, भीमअँप , इंटरनेट बॅकींग, मोबाईल वॉलेट, मोबाईल बॅकिंगद्वारे वीजबिल भरणा केल्यास वीज देयकामध्ये ०.२५ टक्के सूट देण्यात येते. तसेच क्रेडीटकार्ड वगळता नेटबॅकिंग, डेबीटकार्ड, कॅशकार्ड, यूपीआय, डिजिटल वॉलेटच्या माध्यमातून ‘ऑनलाईन’द्वारे होणारा वीजबिल भरणा निःशुल्क आहे. ऑनलाईनद्वारे वीजबिल भरणा केल्यानंतर ग्राहकाच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर लगेचच एसएमएस द्वारे पोच देण्यात येते.
महावितरणची वेबसाईट व मोबाईल अँप तसेच अन्य पर्यायांद्वारे ऑनलाईन वीजबिल भरणा क्रेडीट कार्ड वगळता निःशुल्क आहे. महावितरणच्या आवाहनाला प्रतिसाद देत ग्राहक मोठ्या संख्येत ऑनलाइन वीज बिल भरत असून इतरही ग्राहकांनी या सेवेचा लाभ घ्यावा व घरबसल्या ऑनलाईन सोयीद्वारे वीजबिलांचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.