Published On : Sat, Dec 2nd, 2023
By Nagpur Today Nagpur News

जगात निरंतर शिक्षण हेच प्रत्येक विद्यार्थ्याचे ध्येय असावे -राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

-राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ उत्साहा
Advertisement

नागपूर : भारतीय मुल्यांना अनुसरून सर्वांना उच्च व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा मूळ उद्देश आहे. यामुळे देश एक वैश्विक ज्ञानशक्ती (ग्लोबल नॉलेज पॉवर) म्हणून स्थापित होईल,असा विश्वास देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज येथे व्यक्त केला. औपचारिक पदवी हे शिक्षणाचे अंतिम उद्दिष्ट नसून वेगाने बदल घडणाऱ्या जगात निरंतर शिक्षण हेच प्रत्येक विद्यार्थ्याचे ध्येय असावे, असे आवाहनही त्यांनी केले.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत कविवर्य सुरेश भट सभागृहात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या 111व्या दीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात आले.यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस होते तर केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील, कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी उपस्थित होते.

Gold Rate
04 April 2025
Gold 24 KT 90,500/-
Gold 22 KT 84,200 /-
Silver / Kg - 93,500 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

तंत्रज्ञान आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक असून त्यामुळे सर्व क्षेत्रात बदल घडत आहेत, असे सांगून राष्ट्रपती म्हणाल्या तंत्रज्ञानाच्या सदुपयोगाने देश व समाजाचे हित जोपासले जाऊ शकते तर त्याच्या दुरुपयोगाने मानवतेचे नुकसान होऊ शकते. सध्याच्या काळात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) उपयोग आपले जीवन सुकर करत आहे परंतु यातून निर्माण होणारा डीपफेकसारखा प्रकार सामाजिक स्वास्थासाठी अत्यंत घातक आहे. तंत्रज्ञानाच्या चुकीच्या उपयोगाने निर्माण होणाऱ्या समस्येच्या पार्श्वभूमीवर नैतिक शिक्षणाचा मार्ग उपकारक असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची शतकी वाटचाल उच्च परिमाणे स्थापित करणारी ठरली असून समृद्ध वारसा जोपासणाऱ्या या विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी जीवनाच्या विविध क्षेत्रात महत्वाचे महत्वाचे योगदान दिल्याचा गौरवास्पद उल्लेख करुन राष्ट्रपती म्हणाल्या, विद्यापीठाचे माजी विद्यार्थी अनेक क्षेत्रात अग्रेसर आहेत. त्यांचे सहाय्य घेऊन विद्यापीठाला ग्लोबल सेंटर ऑफ एक्सलंस बनवावे.या विद्यापीठाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू केले हे प्रशंसनीय आहे. देशाच्या विकासात संशोधन व नाविन्यतापूर्ण शिक्षणाची मोलाची भूमिका असून हे विद्यापीठ संशोधन, नाविन्यतापूर्ण शिक्षण व तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देत आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे या विद्यापीठातील फॅकल्टी मेंबर्सच्या नावाने 67 हून अधिक पेटंटची नोंदणी झालेली आहे. विद्यार्थ्यांमध्ये स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष कक्ष निर्माण केला आहे. स्थानिक प्रश्न आणि गरजा लक्षात घेऊन संशोधनावर भर द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

सर्व जग आज ग्लोबल व्हिलेज झाले असून कुठलीही संस्था जगापासून अलिप्त राहू शकत नाही. आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रम आणि आंतरराष्ट्रीय सहयोगावर विद्यापीठाने भर द्यावा असे सांगून त्या म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी स्थानिक समस्या व गरजांनुसार नाविन्यपूर्ण संशोधनाला प्राधान्य दिले तरच जागतिक आव्हानांचा सामना करणे शक्य होईल.

शिक्षण प्रदान करत असतानाच शैक्षणिक संस्थांनी समाजाप्रती असलेली जबाबदारी पार पाडावी. आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना मदत करणे हे शैक्षणिक संस्थांसह आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. अशा वंचित विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून अमृत काळात देशाच्या विकासामध्ये योगदान द्यावे. विद्यापीठाच्या पदवी प्राप्त तसेच शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थिनींची संख्या लक्षणीय असल्याबद्दल विशेष समाधान व्यकत् करुन मुलींच्या शिक्षणातील गुंतवणूक ही देशासाठी मोलाची असल्याचे त्या म्हणाल्या.

उज्ज्वल भविष्याची वाटचाल करत असताना विपरीत परिस्थिती उद्भवल्यास विद्यार्थ्यांनी ज्ञान व आत्मशक्तीने लढावे व आपल्या योग्यतेवर सदैव विश्वास ठेवावा असा संदेश देतांनाच राष्ट्रपतींनी संत तुकडोजी महाराजांच्या ग्रमागीतेतील अभंगाचा दाखलाही दिला.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा स्वीकार केल्यामुळे विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात संधी उपलब्ध होत असल्याचा विश्वास व्यक्त करुन राज्यपाल रमेश बैस म्हणाले, पुर्वी ब्रिटीशकालिन मानसिकतेच्या प्रभावातून नौकरीसाठी शिक्षण होते. आता प्रधानमंत्री मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल घडत आहेत. विद्यार्थ्यांनी नोकरीसाठी न शिकता जागतिक स्तरावरील विकसित कौशल्य आत्मसात करावे, सोबत एखादी जागतिक भाषा आत्मसात करावी. कुशल मानव संसाधन निर्माण करण्यासोबतच योग शिक्षणाचे महत्व लक्षात घेऊन या क्षेत्रातील जागतिक संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्यपालांनी केले.

विदर्भाच्या विकासात विद्यापीठाचे मोलाचे योगदान आहे. विदर्भ हा महाराष्ट्राचा विकसनशील भाग असून विद्यापीठाच्या माध्यमातून स्थानिक गरजांनुसार संशोधन होण्याची गरज आहे. विद्यापीठाने गुणवत्ता राखत शिक्षणाचे सार्वत्रिकरण करावे. विदर्भातील थोर संत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज यांचा आदर्श ठेवत विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण व संस्कार मिळेल अशी पद्धत विकसित करावी, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. भविष्यात शिक्षणालाच महत्व आहे. प्रधानमंत्र्यांनी शिक्षणाचे संपत्तीत रूपांतर करण्याचे आवाहन केले आहे. शिक्षणामुळेच जागतिक आर्थिक महासत्तेचे देशाचे स्वप्न साकार होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

गुणात्मक मनुष्यबळ तयार करणे ही काळाची गरज आहे. जागतिक स्तरावर बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करू शकेल अशी युवापिढी घडविण्याचे आव्हान नागपूर विद्यापीठाने स्वीकारावे,असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. हे विद्यापीठ नवसंशोधनाचे केंद्र म्हणून विकसित होत असून स्टार्टअप इको सिस्टीममध्ये महाराष्ट्राने देशात पहिला क्रमांक पटकाविला आहे. नागपूर विद्यापीठातही नव संशोधन आणि स्टार्टअप इन्क्युबेशन सेंटरच्या माध्यमातून उत्तम कार्य सुरु आहे. शकत महोत्सवी वर्षानिमित्त विद्यापीठात नवसंशोधन तसेच सर्वांगिन विकासासाठी 100 कोटींचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. नवीन आव्हानांचा सामना करण्यासाठी विद्यापीठ सज्ज असल्याचा विश्वास श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला .

विज्ञान व तंत्रज्ञान विद्या शाखेतून डि.एससी. पदवी प्राप्त करणारे डॉ. रामचंद्र हरीसा तुपकरी आणि डॉ. टि. व्ही. गेडाम सुवर्णपदक आचार्य पदवी प्राप्त विद्यार्थिनी राजश्री ज्योतीदास रामटेके यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पदक देवून गौरविण्यात आले.विद्या शाखानिहाय १२९ संशोधकांना या कार्यक्रमात आचार्य पदवी देऊन सन्मानित करण्यात आले. कुलगुरु डॉ सुभाष चौधरी यांनी प्रास्ताविक केले.

Advertisement
Advertisement