महापौर संदीप जोशी यांचे प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना आवाहन
नागपूर : नागपुरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. भविष्यात उद्भवणाऱ्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सोयी-सुविधा आणि साधनांची उपलब्धता करणे गरजेचे आहे. सध्या शाळा बंद असून स्कूल व्हॅन उपयोगात नाहीत. या स्कूल व्हॅनमध्ये किरकोळ बदल करून त्याचे रूग्णवाहिकेत रुपांतर केल्यास रुग्णांसाठी ते सोयीचे होईल. अशा स्कूल व्हॅनचे रुग्णवाहिकेत रुपांतर करण्यात यावे, असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना केले.
कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढते आहे. वेळेवर उपचार मिळण्यास उशीर होत असल्याने मृत्यूसंख्याही वाढत आहे. यासाठी साधनांची उपलब्धता करणे गरजेचे आहे. नागपूर महानगरपालिका रुग्णवाहिकांसह अन्य साधनांची व्यवस्था करीत आहे.
मात्र आता कोरोनाशी संघटित लढा देण्यासाठी लोकसहभागाची गरज आहे. स्कूल व्हॅनमध्ये किरकोळ बदल करून त्याचे रुग्णवाहिकेत रुपांतर करण्यात आले तर अनेक रूग्णांना रुग्णालयात दाखल होण्यासाठी तातडीची सेवा मिळू शकेल. तसेच गेल्या अनेक महीन्यांपासून बेरोजगारीचा सामना करणा-या व्हॅन चालकांना रोजगार उपलब्ध होईल. याची तात्काळ दखल घेण्याची विनंतीवजा सूचना महापौर श्री.संदीप जोशी यांनी पत्रातून केली आहे.
या सूचनेची सकारात्मक दखल घेत प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी या सूचनेबद्दल अनुकूलता दर्शविली असल्याचे महापौर संदीप जोशी यांनी सांगितले.