Published On : Wed, Apr 22nd, 2020

गरजूंपर्यंत मदत पोहोचविण्यासाठी मनपाला सहकार्य करा!

महापौर संदीप जोशी यांचे आवाहन : ‘कम्यूनिटी किचन’ ला दिली भेट

नागपूर : कामासाठी शहरात आलेले अनेक लोक लॉकडाउनमुळे शहरात अडकले आहेत. या लोकांपर्यंत मदत पोहोचविण्यासाठी मनपाच्या सहकार्याने अनेक स्वयंसेवी संस्था पुढे येत आहेत. दररोज हजारो गरजू लोकांपर्यंत अन्न पोहोचविण्याचे कार्य स्वयंसेवी संस्था मनपाच्या माध्यमातून करीत आहेत, हे अभिनंदनीय कार्य आहे. आजच्या स्थितीत जास्तीत जास्त गरजूंपर्यंत मदत पोहोचणे आवश्यक आहे. या कार्यासाठी शहरातील नागरिकांनी पुढे येउन मनपाला सहकार्य करावे, असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले आहे.

Gold Rate
Monday 27 Jan. 2025
Gold 24 KT 80,400 /-
Gold 22 KT 74,800 /-
Silver / Kg 90,900 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपूर महानगरपालिकेच्या सहकार्याने शहरात २७ ‘कम्यूनिटी किचन’ सुरू आहेत. बुधवारी (ता.२२) महापौर संदीप जोशी व आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी मैत्री परिवार संस्था व लॉयन्स क्लब या दोन संस्थांच्या वतीने सुरू असलेल्या ‘कम्यूनिटी किचन’ला भेट दिली. यावेळी मनपाचे प्रभारी उपायुक्त मिलींद मेश्राम, मैत्री परिवार संस्थेचे प्रा.संजय भेंडे, प्रा.प्रमोद पेंडके, रोहित हिमटे, सीएजी ग्रुपचे विवेक रानडे, लॉयन्स क्लबचे विनोद वर्मा, श्री.कौशिक, श्रवण कुमार उपस्थित होते.

महापौरांनी दोन्ही संस्थांमार्फत सुरू असलेल्या ‘कम्यूनिटी किचन’ची आणि त्यामार्फत केल्या जाणा-या कार्याची माहिती जाणून घेतली. मनपाच्या माध्यमातून होत असलेल्या सेवा कार्याबद्दल मनपाचे प्रभारी उपायुक्त मिलींद मेश्राम यांच्या कार्याचे कौतुक करीत महापौर संदीप जोशी यांनी त्यांचे अभिनंदन केले.

महापौर म्हणाले, कोरोनाला हरविण्यासाठी संपूर्ण शहर लॉकडाउनला सहकार्य करीत आहे. आज शहरात विदर्भातील आणि परराज्यातील अनेक विद्यार्थी, नोकरदार, विस्थापित कामगार अडकले आहेत. याशिवाय ज्येष्ठ नागरिक आणि रेशन कार्ड नसलेल्या अनेकांवर मोठे संकट निर्माण झाले आहे. अशा स्थितीत या नागरिकांच्या मदतीकरीता, त्यांना दोन वेळचे जेवण किंवा अत्यावश्यक साहित्यांचा पुरवठा करण्यासाठी अनेक संस्था पुढे आल्या आहेत. दीनदयाल थालीच्या माध्यमातूनही अनेकांना दोन वेळचे जेवण पोहोचविण्यात येत आहे. नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून आजघडीला रोज ४५ हजार लोकांपर्यंत मदत पोहोचविली जात आहे. यासाठी अहोरात्र काम करणारी प्रत्येक व्यक्ती अभिनंदनास पात्र आहे. मात्र गरजूंना मदत पोहोचविण्यासाठी मनपाचे हात अधिक बळकट करण्याची गरज आहे. या सेवा कार्यासाठी कोणत्याही स्वरूपात मदत करू इच्छिणा-यांनी पुढे यावे, असेही आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले आहे.

मैत्री परिवार संस्थेच्यावतीने शहरात सुरेंद्रनगर, वझलवार लॉन धरपेठ आणि अत्रे लेआउट या तीन ठिकाणी ‘कम्यूनिटी किचन’ चालविले जात आहेत. सुरेंद्रनगर आणि वझलवार येथील किचनमधून शहरातील ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, भाड्याने राहणा-या व्यक्ती आदींना दररोज सकाळी व सायंकाळी प्रत्येकी एक हजार असे दोन्ही किचनमधून दररोज चार हजार जेवणाचे डबे पोहोचिण्यात येत आहेत. तर अत्रे लेआउट येथील किचनमधून सकाळी ५०० व सायंकाळी ५०० असे दररोज एक हजार लोकांपर्यंत जेवण पोहोविण्यात येत आहे.

लॉयन्स क्लबच्या माध्यमातून मानवसेवा नगर सेमीनरी हिल्स टीव्‍ही टॉवर येथे ‘कम्यूनिटी किचन’ सुरू करण्यात आली आहे. या किचनमधून हजारीपहाड, पांढराबोडी, सुदामनगरी, फुटाळा या वस्त्यांमध्ये दररोज १६०० लोकांच्या जेवणाची व्यवस्था केली जात आहे. रेशन कार्ड नसणा-यांनाही लॉयन्स क्लबद्वारे जीवनावश्यक साहित्यांची किट उपलब्ध करून देण्यात येत आहे.

४४ स्वयंसेवी संस्था, १५ दानदाते, नउ जणांकडून आर्थिक मदत
लॉकडाउनमध्ये गरजूंपर्यंत मदत पोहोचविण्यासाठी मनपाला ४४ स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य लाभले आहे. या स्वयंसेवी संस्था ‘कम्यूनिटी किचन’मधून तयार होणारे जेवण गरजूंपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करतात. तर ‘कम्यूनिटी किचन’मधून तयार होणा-या अन्नासाठी शहरातील १५ समाजसेवींची मदत प्राप्त झाली आहे. हे दानदाते जेवणाची आवश्यक सर्व साहित्याची मदत करीत आहेत. याशिवाय अनेक स्वयंसेवी संस्था स्वत:च्या खर्चातून जेवण तयार करतात किंवा अन्न साहित्याची मदत करतात. या संस्थांना मदतीसाठी नउ सेवाभावी नागरिक सरसावले आहेत. या नागरिकांमार्फत संस्थांना परस्पर आर्थिक मदत करण्यात आली आहे. यासर्व संस्थांच्या कार्यावर नियंत्रण, त्यांचा लेखाजोखा आणि पाठपुरावा मनपातर्फे केला जातो. या सर्व सेवाभावी स्वयंसेवी संस्था, समाजसेवी नागरिकांच्या मदतीने आजघडीला ४५ हजार लोकांना मदत पोहोचविली जात आहे. आजच्या स्थितीत विविध स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने संपूर्ण शहरात २७ ‘कम्यूनिटी किचन’ सुरू आहेत.

शहराबाहेरील १३७५ नागरिक बेघर निवा-यात आश्रयीत
लॉकडाउनमुळे शहरात अडकलेले नागपूर बाहेरील १३७५ नागरिक मनपाच्या शहरी बेघर निवा-यामध्ये आश्रयाला आहेत. यामध्ये सर्वाधिक संख्या मध्यप्रदेशातील नागरिकांची आहे. मध्यप्रदेशातील ६९३ नागरिक बेघर निवा-यात निवास करीत आहेत. तर नागपूरच्या जवळच्या भागातील भंडारा, गोंदिया, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला, तुमसर, बुलडाणा आणि पुणे या सर्व भागातील २९६, छत्तीसगढ येथील ३५, उत्तरप्रदेश १२९, बिहार ८, तेलंगना १६, आंध्रप्रदेश ४, कर्नाटक १, राजस्थान १५९, झारखंड १३, हरियाणा १२, ओडिशा ४ आणि इतर ५ असे एकूण १३७५ नागरिक मनपाच्या शहरी निवारा केंद्रात वास्तव्यास आहेत.

२७ ‘कम्यूनिटी किचन’साठी सरसावलेल्या संस्था व व्यक्ती

Advertisement