लसीकरण पूर्ण करण्याचे मनपाचे आवाहन : नागपूर शहरात ३ लाख ४३ हजार ८४ नागरिकांनी घेतला बुस्टर डोस
नागपूर : मागील दोन वर्षांच्या निर्बंधानंतर आता गणेशोत्सव जल्लोषात साजरा होत आहे. मात्र या जल्लोषात कुठलाही धोका निर्माण होउ नये यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने कोरोना लसीकरणावर नागपूर महानगरपालिकेद्वारे भर देण्यात आलेला आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या अनुषंगाने मनपाद्वारे शहरातील सर्व गणेश मंडळांमधून कोव्हिडच्या बुस्टर डोस व्यवस्था करण्यात आली आहे. मनपाद्वारे गणेश मंडळातून बुस्टर दिले जात असून पात्र प्रत्येक व्यक्तीने बुस्टर डोस घेउन आपले लसीकरण पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन मनपाच्या आरोग्य विभागाद्वारे करण्यात येत आहे.
नागपूर महानगरपालिका आणि नागपूर जिल्हा प्रशासनाने कोव्हिड लसीकरणाच्या मोहिमेत चांगली भरारी घेतली. आतापर्यंत नागपूर शहरातील १२ वर्षावरील २१,९१,०९४ लोकांनी पहिला तर १७,७५,८७२ व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. त्यामुळे तिस-या व चवथ्या लाटे दरम्यान फारसा धोका निर्माण झालेला नाही. आतापर्यंत ३४३०८४ इतके बुस्टर डोस देण्यात आले आहेत. देशात व जगातील अनेक भागात अजूनही कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. कोव्हिड विषाणू नवनवे रुप घेऊन आपल्यावर हल्ला करण्यास सज्ज आहे. अशा परिस्थितीत १८ वर्षावरील सर्व पात्र व्यक्तीने लवकरात लवकर बुस्टर डोस घ्यावा, ज्यामुळे आपण व आपला परिवार कोव्हिड या जागतिक महामारीपासून सुरक्षित होईल. याकरीता सर्व नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने लसीकरण पूर्ण करून घ्यावे, असेही आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे.
कोरोनाची पहिली आणि दुसरी लाट ही अत्यंत भयंकर आणि जीवघेणी ठरली. वैद्यकीय क्षेत्रातील विविध संशोधनातून कोरोनापासून बचावासाठी मोठे शस्त्र म्हणून लस पुढे आली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कोरोना प्रतिबंधात्मक लस ही सुरक्षेचे मोठे शस्त्र ठरले आहे. यापूर्वीही देशात उद्भवलेल्या पोलिओ, धनुर्वात, स्मॉल पॉक्स यासारख्या आजारांना लसीकरणामुळे प्रतिबंध घालता आला. त्याप्रमाणेच लसीकरणामुळे कोरोनाला सुद्धा आळा घालणे शक्य आहे. त्यामुळे प्रत्येक पात्र व्यक्तीने लस घेणे अत्यावश्यक आहे.
कोरोनाच्या दुस-या लाटेनंतर उपलब्ध झालेल्या प्रतिबंधात्मक लसीमुळे तिस-या आणि चवथ्या लाटेमध्ये रुग्णांचा मृत्यूदर आणि रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण अत्यंत कमी झाले. महाराष्ट्रात सध्या १२ वर्षावरील सर्वांना लसीकरणासाठी पात्र ठरविण्यात आले आहे. नागपूर शहरातील १२ वर्षावरील २१,९१,०९४ लोकांनी पहिला तर १७७५८७२ व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे.
कोव्हिड प्रतिबंधात्मक लसीकरणामुळे कोरोनापासून संरक्षण होत असले तरी प्रतिकारशक्ती टिकवून ठेवण्यासाठी वर्धक मात्रा अर्थात बुस्टर डोस महत्वाचे ठरत आहे. मनपाद्वारे सर्वप्रथम ६० वर्षावरील व्यक्ती, आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाईन वर्कर यांना बुस्टर डोस देण्याची सुरूवात करण्यात आली स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने १५ जुलैपासून ७५ दिवस बुस्टर डोससाठी विशेष अभियान राबविण्यात आले. यासाठी मनपाद्वारे नियमित लसीकरण केंद्रांसह अन्य १०० लसीकरण पथक तैनात करण्यात आले. त्याचे फलीत म्हणून आतापर्यंत ३४३०८४ बुस्टर डोज देण्यात आलेले आहेत. बुस्टर डोस संदर्भात सूचना देण्यासाठी कोविन ॲपवर सुद्धा बदल करण्यात आले असल्याचे आरोग्य विभागाद्वारे कळविण्यात आले आहे.